आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींच्या खेळीने सेना-मनसे पेचात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- निवडणूक न लढवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सोमवारी साकडे घातल्यानंतर मंगळवारी दिवसभर मनसे व महायुतीतील संभाव्य तडजोडीविषयी चर्चा रंगली. त्यातून स्थानिक नेत्यांसमोर पेच वाढला असून, मनसेकडून नाशिकसह आणखी एका जागेचा आग्रह होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते व संभाव्य उमेदवारही अस्वस्थ झाल्याचे चित्र होते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसेने मुसंडी मारत शिवसेनेच्या उमेदवाराला तिसर्‍या क्रमांकावर फेकले होते, या पार्श्वभूमीवर यंदाही शिवसेना व मनसेमधील मतविभाजन राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडेल, अशी अटकळ व्यक्त होत असतानाच गडकरी यांनी मनसेला निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले. त्यामुळे खरोखरच मनसे तटस्थ राहते की महायुतीत सहभागी होते, यावर चर्चा सुरू झाली. सद्यस्थितीत दोन्ही पक्षांचे संभाव्य उमेदवार प्रचाराला लागले असल्यामुळे मनसे शिवसेनेकडून मतदारसंघ सोडून घेणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरी बाब म्हणजे, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्यारूपात हेवीवेट उमेदवार असल्यामुळे दोन हात करण्यासाठी मनसेकडून आमदार वसंत गिते यांचेही नाव पुढे आले आहे. राज यांच्याकडून नाशिकसह बाळा नांदगावकर यांच्यासाठी मुंबईतील एका जागेचा आग्रह धरल्याची चर्चा दिवसभर होती.
व्हॉट्सअँपवर ‘मनसे’ अफवा
व्हॉट्सअँपवर मनसेच्या संभाव्य उमेदवारांविषयी ‘मनसे’ अफवा पसरवल्या जात होत्या. त्यात मनसेची यादीही जाहीर करण्यात आली होती. त्यात बाळा नांदगावकर, वसंत गिते, शालिनी ठाकरेंसह 12 उमेदवार जाहीर झाल्याची आवई उठवली गेली.