आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनिर्माण नव्हे, हे तर पुनर्निर्माण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते गोल्फ क्लबलगतच्या ज्या जागेत महिलांसाठी ‘सिटी हेल्थ क्लब’करिता 2009 मध्ये भूमिपूजन झाले होते त्याच जागेवर गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘योगा हॉल इमारत’साठी भूमिपूजन केले. म्हणजे जागा एकच मात्र नेते दोन, पक्ष दोन अशी स्थिती झाली. माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी हे काम मीच माझ्या आमदारपदाच्या काळात मंजूर करून आणलेल्या निधीतील असल्याचा आरोप केला आहे. तर, विद्यमान आमदार वसंत गिते यांनी मात्र हे काम उर्वरित निधीतून झाल्याचे भ्रमणध्वनीवर सांगितले असले तरी सर्व फलक आणि कोनशिलेवर मात्र हे काम आमदार गिते यांच्या विशेष निधीतून झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

जुन्याच खड्डय़ात पुढील वर्षी दुसर्‍या नेत्याच्या हस्ते वृक्षारोपण होण्याचे प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्याच तालावर गुरुवारी गोल्फ क्लबनजीकच्या दत्त मंदिरालगतच्या जागेवर सुसज्ज व्यायामशाळा आणि योगा हॉल इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. चार वर्षांपूर्वी त्याच जागेवर तत्कालीन आमदार डॉ. शोभा बच्छाव यांनी शासनाच्या विशेष निधीतून 42 लाख 77 हजार रुपये रकमेचा महिलांसाठी सिटी हेल्थ क्लब बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करून आणला होता. त्यानंतर टेंडरसह अन्य बाबींची पूर्तता झाल्यानंतर तत्कालीन अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आल्याचे डॉ. बच्छाव यांनी म्हटले आहे.

तत्कालीन कोनशिला हटवली : मागील भूमिपूजन झाल्याचा पुरावा राहू नये म्हणून त्यावेळी तेथे लावलेली विलासराव देशमुख यांच्या नावाची कोनशिलादेखील हलविण्यात आल्याचा आरोप डॉ. बच्छाव यांनी केला. या प्रकाराची कल्पना मनसे अध्यक्ष राज यांना नसली तरी मनसेच्या स्थानिक नेत्यांना किंवा पालिका प्रशासनालाही हे ज्ञात नव्हते का? जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे मनसेच्या धुरिणांनी कायम ठेवले तर त्यातून जनमानसातील मनसेच्या प्रतिमेवरील धूळ वाढतच जाणार असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

प्रकल्पात या सुविधा : गोल्फ क्लबच्या या जागेत सुसज्ज व्यायामशाळा व योगा हॉल बांधण्यात येणार आहे, तर खुल्या व्यायामशाळेत जॉगिंग ट्रॅक व मुख्य मैदानाच्या मोकळ्या जागेत व्यायामाची उपकरणे बसविण्यात आली.

भूमिपूजन त्यांनी केले; टेंडर मात्र मी काढले
2009 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासाठी विशेष निधी राज्य शासनाने दिला. त्यातून तत्कालीन आमदार डॉ. शोभा बच्छाव यांनी अनेक कामांचे भूमिपूजन केले, मात्र प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत. निधी अखर्चित राहिला. हा निधी विभागीय आयुक्तांनी नवनिर्वाचित आमदारांच्या चारही मतदारसंघांसाठी दिला. या 7 कोटी रुपयांतून गोल्फ क्लबवर नव्याने सिटी हेल्थ क्लबचे काम केले जाणार असून, मागील महिन्यात त्याचे टेंडर माझ्या पाठपुराव्यामुळे निघाले. निवडणुकीच्या तोंडावर असे एक नाही तर अनेक कामांचे भूमिपूजन बच्छाव यांनी केले; मात्र प्रत्यक्ष कामे केलीच नाहीत. त्यामुळे उगाच निर्थक आरोप बच्छाव यांनी करू नये. वसंत गिते, आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निधीसह टेंडरही मीच काढले होते
2008 मध्ये काम मंजूर करून 2009 मध्ये त्याचे भूमिपूजनही केले. दोन वर्षांसाठीच्या 10 कोटीपैकी 42.77 लाखांचा राज्य शासनाचा विशेष निधी पालिकेकडे आल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, माझ्यानंतर मनसेचे आमदार निवडून आल्याने त्यांनी चार वर्र्षे कामास अडथळे आणले. नूतन आमदारांना शासनाचा विशेष निधी मिळाला नसल्याने ते काम त्यांचे असूच शकत नाही. ते काम माझ्या काळातच मंजूर झालेले आहे. डॉ. शोभा बच्छाव, माजी राज्यमंत्री