आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षार्थींच्या मदतीला धावली ‘मनविसे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहकपदाच्या रविवारी झालेल्या परीक्षेत नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालय केंद्रावर तांत्रिक बाबींमुळे उशीर झालेल्या परगावच्या काही उमेदवारांना परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, मनविसेचे पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावल्याने या परीक्षार्थींना परीक्षा देण्याची संधी मिळाली.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडतर्फे एक हजार 23 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्या वेळी हॉल तिकिटावर अपुरा पत्ता असल्याने, तसेच रेल्वे व बसगाड्यांना उशीर झाल्यामुळे परगावांहून आलेल्या अनेक परीक्षार्थींना परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचणे शक्य झाले नाही. काही जणांना अवघी दहा मिनिटे उशीर होऊनदेखील परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्यात आला. थोडासाच उशीर झालेल्या परगावच्या अशा अनेक परीक्षार्थींना परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात आल्याने या परीक्षार्थींनी मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोरडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी ‘मनसे स्टाइल’ने समजावताच समन्वयकांनी संबंधित उमेदवारांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. या प्रकारामुळे काही काळ गोंधळ झाल्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडली.

राज्यात दहा जिल्ह्यांमधून ७९ केंद्रांवर ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून 41 हजार 709 परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते. नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात वरील प्रकार घडला. या परीक्षार्थींमध्ये मुंबई, येवला, धुळे, चांदवड, सटाणा आदी ठिकाणच्या सुमारे तीस ते पस्तीस उमेदवारांचा समावेश होता. मनविसेच्या हस्तक्षेपानंतर यापैकी काही परीक्षार्थींनी परीक्षा दिली. मात्र, वेळ कमी पडल्याने अनेक उमेदवारांच्या चेह-यावर नाराजी दिसत होती. मनविसेचे उमेश भोई, अतुल चव्हाण, मयूर भंडारी, शिवा धोंगडे, आदित्य धोंगडे, महेश कदम, शशी चौधरी, बंटी धोंगडे यांनी परगावांहून आलेल्या परीक्षार्थींना मदत केली.

या केंद्रांवर झाली परीक्षा
  • गुरू गोविंदसिंग महाविद्यालय
  • के. के. वाघ महाविद्यालय
  • बिटको महाविद्यालय
  • आरंभ महाविद्यालय
  • सिडको महाविद्यालय
  • चांदवड महाविद्यालय
पर्यवेक्षकांकडून अडवणूक
रेल्वे उशिरा आल्यामुळे, तसेच हॉल तिकिटावरील पत्ताही अपुरा असल्याने मला परीक्षेसाठी उशीर झाला. त्यामुळे पर्यवेक्षक परीक्षेला परवानगी देत नव्हते. मात्र, मनविसेच्या कार्यकर्त्यांमुळेच मला परीक्षेला बसता आले.
संतोष आंधळे, मुंबई

वेळ कमी पडला
परीक्षा सुरू होऊन केवळ दहा मिनिटे झाली होती. पंधरा मिनिट उशीर झाला, तरी परीक्षा केंद्रात घेणे बंधनकारक आहे. मात्र, विरोध झाल्याने आमचा त्यामध्येच जास्त वेळ गेला. अखेर परीक्षेला बसू दिले. पण, त्यामुळे वेळ कमी पडला.
रेश्मा निकम, पवननगर

हित महत्त्वाचे
थोडासा उशीर झाल्याने अनेकांना परीक्षेला बसून दिले जात नव्हते. मात्र, परीक्षार्थी मुद्दाम उशिरा आले नव्हते. त्यामुळे आम्ही आमच्या ‘स्टाइल’ने समजावून सांगितले. उत्तीर्ण झाल्यावर मराठी मुलांचेच कल्याण होणार आहे.
प्रकाश कोरडे, जिल्हाध्यक्ष मनविसे

अतिरिक्त वेळ नाही
काही उमेदवारांना उशीर झाला होता. मात्र, मनविसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना परीक्षेला बसू दिले. पण, त्यांना अतिरिक्त वेळ देता येत नसल्याने आम्ही वेळेतच त्यांच्याकडून पेपर जमा केले.