आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mobile Library For Blind Children Kusumagraj Prathishthan Initiative

दृष्टिबाधित बालकांसाठी फिरता साहित्य खजिना, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानने वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अनेक कारणांनी वाचनालयापर्यंत येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून जनसामान्यांपर्यंत त्यांच्याच शाळा अथवा घरांपर्यंत ग्रंथसंपदा पोहोचवण्यासाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या अभिनव उपक्रमाची २००९ मध्ये सुरुवात केली. अाता याचे पुढचे पाऊल म्हणजे दृष्टिबाधित बालगोपाळांसाठी हा साहित्याचा खजिना त्यांच्या घरांपर्यंत पाेहाेचविण्यासाठीचा ‘ग्रंथ तुमच्या दारी - बोलकी पुस्तके’ हा उपक्रम. या उपक्रमास शुक्रवारी (दि. ८) प्रारंभ हाेत अाहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही याेजना अल्पावधीतच भौगोलिक सीमा पार करत भारताच्या विविध राज्यांत तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, अटलांटा अशा देशांत एकंदरीत एक कोटी २५ लाख रुपयांची ग्रंथसंपदा घेऊन पाेहाेचली अाहे. अाता दृष्टिहीनतेमुळे वाचता येणे शक्य नाही त्यांना समाविष्ट केल्याशिवाय योजना परिपूर्ण होऊ शकत नाही, असे कळल्यावर अाता नॅब डॉ. एम. एस. मोडक सेंटरने पुढाकार घेतला अाहे. नॅब डॉ. मोडक रिसर्च अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर व्हिजुअली चॅलेंज्ड ही संस्था काही वर्षांपासून दृष्टि- बाधितांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत आहे. शिक्षण हा संस्थेचा प्रमुख उद्देश असून, त्याअंतर्गत विविध प्रकारचे संशोधन प्रशिक्षण कार्यक्रम संस्था सातत्याने आयोजित करत असते. दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त इतर साहित्य आत्मसात करण्यामध्ये अनेक अडचणी येतात. दृष्टिबाधितांनाही दर्जेदार साहित्य अनुभवायला मिळायला हवे. परंतु, ब्रेललिपीत ते उपलब्ध नसल्याने त्यांना वाचनावर मर्यादा येतात.

या अडचणीवर मात करण्यासाठी आणि दृष्टिबाधित व्यक्तींनाही दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान ‘ग्रंथ तुमच्या दारी - बोलकी पुस्तके’ हा उपक्रम सुरू करीत अाहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत १०० बोलकी पुस्तके असलेल्या ऑडिओ सीडींचा संच त्यांच्या शाळेत उपलब्ध हाेणार अाहे. प्रत्येक संचामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचा समावेश असेल, ठराविक कालावधीनंतर प्रत्येक संच आपापसात बदलले जाणार अाहेत. नजीकच्या काळात नाशिक विभागातील सर्व शाळांचा समावेश या योजनेत करून संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तार करण्याचा आमचा मानस असल्याचे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे सर्वेसर्वा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे, तसेच नॅबच्या सचिव शाहीन शेख यांनी सांगितले. शुभारंभासाठी रवींद्र बारटक्के यांचे सहकार्य लाभले आहे.

अंध बांधवांसाठी साेयीस्कर
अंधबांधव अापल्यासारखे वाचू शकत नाहीत. ब्रेल लिपीतील पुस्तकेही फार माेठी असतात अाणि उत्तमाेत्तम साहित्य ब्रेलमध्ये भाषांतरित करणे अवघड अाहे. म्हणूनच या बांधवांची वाचनाची वा साहित्यातील रुची पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम अाम्ही सुरू केला अाहे. यात काही अंध बांधवांचीही मदत अाम्हाला हाेत अाहे. विनायक रानडे, विश्वस्त,कुसुमाग्रज स्मारक

उपक्रमाचे अाज उद‌्घाटन
अंध बांधवांसाठी असलेल्या या उपक्रमाचे उद‌्घाटन शुक्रवारी (दि. ८) सकाळी १० वाजता गंगापूरराेडवरील कुसुमाग्रज स्मारकात हाेणार अाहे. या कार्यक्रमासाठी गायक, संगीतकार अवधूत गुप्ते अाणि दिग्दर्शक अजित भुरे यांची खास उपस्थिती असणार अाहे. या कार्यक्रमाला नाशिककर रसिकांनी उपस्थित राहावे, असे अावाहन प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले अाहे.