आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक: कमाईचे फसवे मोबाइल ‘मनोरे’; टेलिकॉम कंपन्यांच्या नावाचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘परदेशातील टेलिकॉम कंपनीला मोबाइल टॉवर उभारण्यासाठी जमीन वा छत भाड्याने घेणे असून, 95 हजार रुपये भाडे, सव्वालाख रुपये अँडव्हान्स आणि सुरक्षारक्षकाला 20 हजार रुपये मासिक पगार दिला जाईल,’ अशा प्रकारची आमिषे दाखवून अनेक बनावट कंपन्या लोकांची राजरोस फसवणूक करीत आहेत. माहिती व प्रसारण खात्याच्या नावाने सुरू असलेल्या या आमिषांना भुलून जिल्ह्यातील अनेक जागा वा इमारत मालकांनी कोट्यवधी रुपये बनावट कंपन्यांना दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पैसे मिळाल्यानंतर कंपन्या गाशा गुंडाळत असल्याचे लक्षात आल्यानंतरही लोकलज्जेस्तव तक्रार करण्यासाठी अद्याप फारसे कोणी पुढे आलेले नाही.

मोबाइल मनोरे भाड्याने देण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. इमारतीची गच्ची वा जागा मनोर्‍यासाठी जागा भाड्याने देऊन महिन्याला हजारो रुपये कमवायची अनेकांची इच्छा असते. ही इच्छाच ‘कॅश’ करीत काही बनावट कंपन्यांनी हा गोरखधंदा सुरू केला आहे. वृत्तपत्रातील जाहिरात आल्यानंतर जागा-इमारत मालक संबंधित कंपनीशी संपर्क साधतात. त्यानंतर कंपनीची विश्वासार्हता दर्शवण्यासाठी संकेतस्थळ दिले जाते. त्यावरदेखील बनावट माहिती असते.

अशी होते फसवणूक
जाळ्यात ग्राहक फसल्यावर सुरुवातीला केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या अखत्यारितील काही प्रमाणपत्रे मागवली जातात. ती तातडीने मिळणे अशक्य असल्यामुळे संबंधित ग्राहक कंपनीलाच विनंती करून कागदपत्रांना पर्यायी व्यवस्था काय असल्याचे विचारतो. या वेळी साडेतीन हजारांची मागणी करून कागदपत्रे मिळवून देण्याचा दावा केला जातो. त्यानंतर सदर ग्राहकाला मोबाइल संदेशाच्याद्वारे अकाउंट नंबर दिला जातो. या अकाउंटमध्ये ग्राहकाने पैसे भरावे, असे सांगितले जाते. त्यानंतर काही दिवसांतच कुरिअरद्वारे संबंधित ग्राहकाकडे प्रमाणपत्रांचा गठ्ठाच येतो. त्याला कंपनीचे माहितीपत्रक व तत्सम माहितीही जोडलेली असते.

पैसे मिळाल्यानंतर कंपन्या गुंडाळतात गाशा
तक्रार करण्यासाठी पुढे यावे
एखादी कंपनी अकाउंटमध्ये पैसे भरावयास लावत असेल तर संबंधित ग्राहकाच्या मनात तेथेच शंकेची पाल चुकचुकवयास हवी. दुर्दैवाने तरीही फसवणूक झाली तर किमानपक्षी गुन्हा दाखल करण्यासाठी तरी पुढे यावे. अशा प्रकरणांमध्ये तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येतच नसल्यामुळे संबंधितांच्या ते पथ्यावर पडते. अशा तक्रारी आल्यास तत्काळ दखल घेऊन कारवाई करता येते. कोणाची फसवणूक झाल्यास 23052 या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधावा.

बनावट कागदपत्रांवर सरकारी मोहोर
सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे कंपनीकडून केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या नावाने चक्क बनावट कागदपत्रे दिली जातात. त्यात अशोकस्तंभाचा शिक्काही असतो. हे कागदपत्रे बनावट आहेत, असा कोणालाही संशय येणार नाही, अशा बेमालूम पद्धतीने ती बनवलेली असतात. कागदपत्रांच्या या रूपावर भाळूनच संबंधित ग्राहक कंपनीच्या जाळ्यात अडकतो. वास्तविक, अशोकस्तंभाचा आणि सरकारी खात्याच्या नावाचा वापर करण्यास कायद्याने मज्जाव आहे. मात्र, या कायद्यांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते.

आता 47 हजारांची मागणी
मी पेपरमधील जाहिरात वाचून फोन केला होता. त्यानंतर त्यांनी अकाउंट नंबर देण्याच्या बहाण्याने प्रथमत: माझ्याकडून पाच हजार 300 रुपयांची मागणी केली. मी हे पैसे कंपनीच्या अकाउंटवर टाकल्यानंतर करारासाठी सात हजार रुपये मागण्यात आले. कंपनीचे संकेतस्थळ आणि एका आघाडीच्या कंपनीचे हुबेहूब असल्यामुळे मी फसत गेलो. आता ही मंडळी करारासाठी 47 हजार रुपयांची मागणी करीत आहेत.
- अक्षय लांडगे, फसवणूक झालेला युवक

मोठय़ा कंपन्यांच्या नावानेही बनवेगिरी
एअरसेल, एअरटेल, आयडिया, रिलायन्स या सारख्या मोठय़ा कंपन्यांची नावे वापरून माहितीपत्रके आणि करारनामे पाठविल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. यात करारनाम्यासाठी विशिष्ट रकमेची मागणी ग्राहकांकडून केली जाते.

अधिकृत कंपन्या जाहिरातीच देत नाहीत
कुठलीही कंपनी मनोर्‍यासाठी जागा भाड्याने घेण्याची जाहिरात देत नाही. ज्या जाहिराती प्रसिद्ध होतात त्या बनावट कंपन्यांनी दिलेल्याच असतात. संबंधित कंपनी आपल्या नियोजनानुसारच मनोरे उभारते. त्यापूर्वी जागेची तपासणी केली जाते. हे काम कंपनीतील कर्मचारी वा वेंडरकडून केले जाते. संबंधित जागा निकषात बसत असली तरच ती भाडेतत्त्वावर घेतली जाते.
-पंकज कुलकर्णी, व्यवस्थापक, रिलायन्स जीओ इन्फोकॉम

बँकेचे अकाउंट सुरू होते कसे?
बँक खाते सुरू करण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. कागदपत्रांच्या शहानिशेनंतर खाते सुरू केले जाते. मनोर्‍यांच्या नावाने फसवणूक करणार्‍या कंपन्या जेव्हा एखाद्या बँकेत खाते सुरू करतात व काही कालावधीतच ते बंदही करतात. अशा स्थितीत संबंधित बँकेच्या ते लक्षात का येऊ नये? म्हणजेच बँकेचे कर्मचारीही त्यात अडकल्याची शंका येते.
-स्वप्नील येवले, मनोर्‍यांचे नोंदणीकृत वेंडर

साडेतीन हजारांची फसवणूक
एशियन टेले नेटवर्कच्या नावाने माझ्याकडून 25 हजार रुपयांची मागणी करण्यात येत होती. माहिती आणि प्रसारण खात्याकडून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी साडेतीन हजार रुपये माझ्याकडून आकारले. मात्र, संशय आल्यामुळे मी पुढील पैसे भरणे थांबवले आहे.
-बाळासाहेब कासार, फसवणूक झालेले शेतकरी

20 हजारांपेक्षा अधिक भाडे नाही
नाशिक जिल्ह्यात 5 ते 20 हजारांपर्यंतच जागेला भाडे मिळाले आहे. डिपॉझिट दिले जात नाही. मात्र, संबंधित कंपन्या सर्रासपणे 95 हजार रुपये भाडे व आठ लाख रुपये डिपॉझिटचे आमिष दाखवितात. विविध कर भरण्याची जबाबदारीही कंपनीचीच असते. महत्त्वाचे म्हणजे सेल्युलर कंपन्यांची मुख्य कार्यालये केवळ पुण्यालाच आहेत. ती बंगळूरू किंवा दिल्लीत नाहीत.
-प्रशांत कळवणकर, मनोर्‍यांचे नोंदणीकृत वेंडर

जागामूल्यापेक्षाही भाडे अधिक
मोबाइल मनोर्‍यांची जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी शहरातील नागरिकांसह शेतकरीदेखील मोठय़ा संख्येने उत्सुक असतात. बर्‍याच वेळा तर जागेच्या मूल्यापेक्षाही अधिक भाडे देण्याचे आमिष संबंधित कंपनी देत असते. परंतु, तरीही या लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत नाही, हे विशेष.