आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर नगरपालिकेकडून मोबाइल मनो-यांना एप्रिलनंतर टाळे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - कर भरण्याच्या लेखी सूचना अनेकदा देऊनही मोबाइल कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने नगरपालिका व ग्रामपंचायतींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एप्रिलनंतर ठिकठिकाणी उभारण्यात आलेले मनोरे बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात येणार आहे. तशी कारवाई करण्याचे संकेत नगरपालिकेने दिले आहेत, तर वावी येथे बुधवारी होणा-या ग्रामसभेत टाळेबंदी निर्णयाचा पवित्रा घेण्यात आला आहे. दरम्यान, मोबाइल कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा कर थकवला असल्याची धक्कादायक माहिती उडेजात आली आहे.
शहरात नऊ कंपन्यांचे मोबाइल मनोरे उभारण्यात आहेत. ना हरकत दाखला देताना शासकीय नियमाप्रमाणे विहित कर भरण्याच्या लेखी अटीनंतर टॉवर उभारणीस परवानगी देण्यात आली आहे. बहुतांश कंपन्यांनी उभारणीनंतर एक छदामही भरलेला नाही. पाच ते सात वर्षांपासून हा कर थकीत असल्याचे नगरपालिकेतून सांगण्यात आले. केवळ टाटा व रिलायन्स या दोन कंपन्यांनी कर भरले आहेत. थकीत कंपन्यांना वेळोवेळी लेखी सूचना देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याने कडक कारवाई करण्याबाबत पावले उचलली जाणार आहेत.
गुळवंचला सुधारित कर देण्यास टाळाटाळ - गुळवंच ग्रामपंचातीत एका कंपनीने मनोरा उभारला असून, त्यांच्याकडून दोन हजार 500 रुपये कर भरला जातो. त्यांना चटई क्षेत्रानुसार सुधारित दरपत्रक देण्यात आले आहे. त्यानुसार कर वसुलीसाठी देयक देण्यात आले असूनही नवीन दराप्रमाणे कर भरला जात नाही. सुधारित दरानुसार कर भरण्याबाबत पंचायतीने ठराव केला आहे.
वावीत दोन लाख रुपयांचा कर थकीत - वावी ग्रामपंचायतीच्या हद्दीत चार मोबाइल मनोरे आहेत. सात वर्षांपासून कर चुकवेगिरी करण्यात येत असल्याने ग्रामपंचायतीचा दोन लाख रुपयांहून अधिक महसूल थकीत आहे. सूचना देऊनही कर भरला जात नसल्याने ग्रामपंचायत पदाधिका-यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वावी ग्रामसभेचा आज निर्णय - वावी ग्रामपंचायतीची बुधवारी ग्रामसभा होणार असून, त्यात कर चुकवणा-या मोबाइल कंपन्यांच्या मनो-याची टाळेबंदी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला जाणार आहे. पत्ता व्यवस्थित न देणे, नोटिसीला उत्तर न देणे असे प्रकार कंपन्यांकडून केले जात असून, कर वसुलीसाठी कडक कारवाईचे धोरण आखण्याची आम्ही ठरवले आहे. त्याचा आराखडा तयार असून, ग्रामपंचायतीच्या सभेत त्यावर चर्चा होऊन शिक्कामोर्तब होईल. - विठ्ठल राजेभोसले, उपसरपंच, वावी
कराबाबत दुर्लक्ष - खासगी जागेत मनोरे उभारले असले तरी कर भरावा लागणार असल्याने त्याकडे कंपन्यांकडून दुर्लक्ष केले जाते. ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखलाही घेतला नाही. उलट व्यवसाय कर म्हणून केवळ दोन हजार 800 रुपयांचा धनादेश कंपन्यांनी पाठवला. तो परत केला असून, कर वसुलीसाठी करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. - डी. बी. भोसले, ग्रामविकास अधिकारी, नांदूरशिंगोटे