नाशिक - ‘सत्ता मिळूनही नवनिर्माण करता आले नाही’, या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने आता खासगीकरणातून मॉडर्न शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेचा एक रुपयाही खर्च होणार नसून नाशिककरांच्याही खिशाला झळ बसणार नाही, असा महापौरांचा दावा आहे. शौचालयावरील जाहिरातींतून मिळणार्या उत्पन्नाद्वारे कंत्राटदार देखभाल-दुरुस्ती करणार आहेत.
शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था हा चर्चेचा विषय बनला आहे. महिलांसाठी तर स्वतंत्र शौचालयेच नाहीत. अस्तित्वातील शौचालयांची अवस्थाही दयनीय आहे. शौचालयांची संख्याही कमी आहे.
नवीन बांधकामासाठी खर्च करण्यापेक्षा खासगीकरणातून उपाय शोधण्यासाठी केलेल्या चाचपणीत दिल्ली-मुंबईत खासगीकरणातून उत्तम सुविधा असलेली शौचालये सुरू असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर काही कंपन्यांकडून अशा पद्धतीने शौचालये बांधून देण्यासाठी प्रस्ताव आले. त्यास मंजुरी देण्याच्या विचारापर्यंत सत्ताधारी पोहचले आहेत. मॉडर्न शौचालयाच्या रचनेबाबतचे डिझाईनही सादर करण्यात आले आहे.
गर्दीच्या ठिकाणी शौचालये
प्रामुख्याने शहरातील प्रमुख मार्ग, वर्दळीची ठिकाणे व जॉगिंग ट्रॅकजवळ शौचालये उभारली जातील. देखभाल करणार्याला जाहिरातीसाठी मोक्याची जागा उपलब्ध होईल, हाही हेतू यामागे आहे. त्यामुळे उत्पन्न घटल्याचे कारण देत योजना बंद पडणार नाही. जेमतेम 40 चौरस फूट जागेत शौचालय तयार होईल.
चांगली सुविधा मिळेल
सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था हा अतिशय महत्त्वाचा विषय आर्थिक खडखडाटामुळे चांगल्या सुविधा देण्यात महापालिकेला अडचणी येत आहेत. या पाश्र्वभूमीवर खासगीकरणातून चांगली शौचालये नाशिककरांना मिळणार असून दोन संस्थांनी शौचालय उभारणीसाठी तयारीही दाखवली आहे. अँड. यतिन वाघ, महापौर