आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरएसएसचे मोहन भागवत आजपासून नाशकात घेणार संघकार्याचा आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सरसंघचालकमोहन भागवत यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील बिनीचे पदाधिकारी सेवाकार्याचा आढावा तसेच पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवार(दि. ७) पासून तब्बल चार दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत. पैकी पहिले दोन दिवस संघाचे कामकाज हा मुद्दा केंद्रस्थानी असेल, तर पुढील दोन दिवसांत परिवारातील बजरंग दल, विहिंप, अभाविप आदी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला ऊर्जितावस्था प्राप्त झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपल्या स्वयंसेवकांना ऊर्जा मिळावी, यासाठी हा उपक्रम आखला आहे. त्र्यंबकेश्वर येथील तळवाडेतील विश्वयोग दर्शन आश्रमात पदाधिकाऱ्यांसोबत वार्तालाप होईल. भागवत मंगळवारी सायंकाळीच नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसंपर्कप्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे, मनमोहन वैद्य, शारीरिक शिक्षणप्रमुख सुहासराव हिरेमठ यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी सदस्य तसेच राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहतील. पहिले दोन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामकाज तसेच सेवाकार्याचा आढावा घेतला जाईल. संघाची पुढील भूमिका कशी असेल, याबाबत पदाधिकारी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले जाईल. शुक्रवार आणि शनिवारी संघ परिवाराशी संलग्न बजरंग दल, विहिंप, अभाविप आदी संघटनांच्या सेवाकार्याचा आढावा घेतला जाईल तसेच पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून संघटनांच्या पुढील कार्याची दिशा काय असेल, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.