नाशिक- पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांचे प्रिय नातू शहीद-ए-आजम हजरत इमाम हुसेन व शौदा-ए-करबला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणा-या मोहरमच्या पहिल्या दहा दिवसांची मंगळवारी यौम-ए-आशुरा पाळून सांगता झाली. विविध धार्मिक कार्यक्रमांत शहीद-ए-आजम हजरत इमाम हुसेन व शौदा-ए-करबला यांचे स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली. सायंकाळी शहरात मोहरमनिमित्त बनविण्यात आलेल्या ताजियांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
यौम-ए-आशुरानिमित्त सकाळपासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली. शहरातील सर्वच मशिदीत कुरआनख्वानी (सामूहिक कुराण पठण) व सकाळी आशुराचे विशेष नमाजपठण झाले. जुन्या नाशकातही काही ठिकाणी नियाज-ए-हुसेनचे आयोजन करण्यात आले. जुन्या नाशकातील बागवानपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, मुलतानपुरा, काझीपुरा, नानावली, नागजी हॉस्पिटल परिसर, द्वारका, वडाळा गावासह सातपूर व सिडको परिसरात सरबताचे वाटप करण्यात आले. सायंकाळी इमामशाही येथील मानाचा ताबूत "हालोका ताजिया'च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. अनेकांनी या वेळी नवसपूर्तीसाठी या ताजियाला विविध भेटवस्तू चढविल्या. सर्वधर्मीय भाविकांच्या हजेरीने इमामशाही परिसरात हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडले. शहरातील ताजिया विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यापूर्वी इमामशाही येथे हजेरी लावली. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी ताजियांना हार चढविला. त्यानंतर जुने नाशिक परिसरातील चौक मंडई येथून ताजियांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी फातेहा पठण केले. वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रमेश पाटील, शिवाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजिज पठाण आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
ताजियांच्या दर्शनासाठी गर्दी, यात्रेचीही सांगता
सारडा सर्कल येथील मानाचा ताबूत हालोका ताजियाच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ताजियाला रात्री उशिरा इमामशाही येथे पारंपरिक पद्धतीने मातीत दफन करण्यात आले. तसेच, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रेचीही मंगळवारी सांगता झाली.