आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरूणीचा पाठलाग करून भररस्त्यात धरला टी शर्ट; चाकू दाखवून केले असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत भररस्त्यात तिचा टी शर्ट पकडून चाकूचा धाक दाखवत मैत्री करायची असून तुझ्याशी लग्न करायचे अाहे, असे सांगत एका विकृत युवकाने या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता कॉलेजरोडवर घडला. याप्रकरणी संशयित प्रेमवीरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. घटनेनंतर तो फरार झाला. याप्रकरणी संशयित प्रेमवीराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. 


याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी सकाळी महाविद्यालयातून घरी येत असताना ओळख असलेला संशयित विशाल तिवर (रा. अशोकनगर, सातपूर) हा पाठलाग करत असल्याचा संशय आल्याने मुलांच्या गर्दीत गेली. मात्र संशयिताने टी-शर्ट पकडून जवळ ओढले. ‘माझ्याशी मैत्री कर, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तू हो म्हणाली नाही तर तुझ्या घरच्यांची बदनामी करेल’ असे म्हणत खिशातून चाकू काढला माझ्याकडे हत्यार आहे, विचार कर असे बोलून ताे निघून गेला. घडलेल्या प्रकाराने या मुलीच्या तोंडातून शब्दही फुटत नसल्याने काही ओळखीच्या मुलींनी तिला धीर देत तिच्या घरी नेले. कुटुंबीयांना घडलेला प्रकार तिने सांगितला तत्काळ पोलिसांत धाव घेत घडलेले प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपनिरीक्षक अादिनाथ मोरे यांचे पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयिताचा शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. संशयित युवकाच्या विरोधात लहान मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा (पोक्सो) तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


अल्पवयीन मुली हाेताहेत लक्ष्य
शहरात अल्पवयीन मुलींना फसू लावून पळवण्याचे प्रकार सुरू आहेत. १६ सप्टेंबरला म्हसरूळच्या वडनगर येथेही एका शाळकरी मुलीची बस अडवत तिच्यावर पाणी फेकत ‘माझ्या प्रेमाला हो म्हण, नाही तर अॅसिड फेकेन’ अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला होता. म्हसरूळ पोलिसांनी विकृतास अटक केली होती. यानंतर चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीला धमकी दिल्याचा प्रकार घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


पोलिस गस्तीचा अभाव
जॉगिंग ट्रॅक परिसरात मुले-मुली एकांतात बसलेले असतात. प्रेमीयुगुलांमध्ये वाद होतात. येथे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. काही ज्येष्ठ नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांना कळवले. पोलिस गस्त घालतात मात्र या मुलांना का थांबला अशी विचारणा हाेत नाही. 


पालकांनी रहावे सजग

पालकांनी मुलीच्या मित्र-मैत्रिणींबाबत माहिती घ्यावी, शाळा-महाविद्यालयात पालक सभांना हजर रहात पाल्याची शैक्षणिक आणि इतर माहिती घ्यावी. मुलीच्या वागणुकीत बदल आढळल्यास समज द्यावी. शिक्षकांच्या संपर्कात रहावे. 


सार्वजनिक ठिकाणी होणार कारवाई 
जॉगिंग ट्रॅक,गोदापार्क आदी ठिकाणी एकांतात बसलेल्या प्रेमीयुगुलांची चौकशी करण्यात येणार आहे. यात अल्पवयीनांचा समावेश असल्यास त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात येणार आहे. गस्त सुरूच आहे. कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. 
-लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त, परिमंडळ 


मुलींची सुरक्षा धोक्यात 
शाळा,कॉलेज, बसस्थानक येथे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. सकाळी सायंकाळी या ठिकाणी टवाळखोरांचा वावर असतो. टवाळखोरांकडून मुलींच्या वादातून हल्ला होण्याचे प्रकार घडले आहे. यावेळेस पोलिसांची गस्त होत नसल्याने टवाळखोरांची मस्ती वाढली आहे. पोलिसांच्या दामिनी, मर्दानी आणि महिला पथकाकडून गस्त होत नसल्याने मुलींची सुरक्षा धोक्यात अाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...