आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mono, Bullet Train Usefull For Saving Time, Modi Answered To Nashik Youth

वेळ वाचविण्यासाठी मोनो, बुलेट ट्रेन गरजेच्या; नाशिकच्या तरुणाच्या प्रश्नाला मोदींचे उत्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आज प्रत्येकासाठी वेळ ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून, ती वाचविण्यासाठी वेगवान मोनो, बुलेट ट्रेनसारख्या सुविधा गरजेच्या आहेत. या सुविधांसाठी खर्च जरी खूप येत असला तरी जागतिक स्तरावर अत्यंत कमी व्याजदरात त्यासाठी कर्ज उपलब्ध आहे. त्यामुळे दीर्घकालीन सुविधा देण्यासाठी अशा प्रकारच्या रेल्वे सुरू झाल्या पाहिजेत, असे ठाम मत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात व्यक्त केले. नाशिकमधून भीष्म कजेरिया या तरुणाने याबाबत मोदींना प्रश्न विचारला होता.

वेळ वाचविण्यासाठी मोनो, बुलेट ट्रेन गरजेच्या
सीएजी या संस्थेकडून ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम देशभरातील 300 शहरांत 1000 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, चहा पिता पिता मोदींशी चर्चा करण्याची संधी यातून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. अहमदाबाद येथे एका चहाच्या ठेल्याजवळ बसून चहाचा आस्वाद घेत घेत मोदी या शहरांतून आलेल्या विविध प्रश्नांना लाइव्ह उत्तर देत होते. शहरातील पंचवटी कारंजा परिसरातील कलंत्री कॉम्प्लेक्स, गंगापूररोडवरील नगरसेविका सीमा हिरे यांच्या कार्यालयासमोर, तर कॉलेजरोडवरील सलीम टी स्टॉल तसेच नाशिकरोड येथे याचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिकमधून भीष्म कजेरिया या तरुणाला मोदींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्याने दोन शहरांना जोडण्यासाठी आज विमानाचे प्रचंड महागडे भाडे असल्याने एकाच वेळी लाखो लोकांना जोडणार्‍या मोनो, मेट्रो, बुलेट ट्रेन गरजेच्या आहेत का? याबाबत आपले मत काय, असा प्रश्न त्याने मोदींना विचारला. प्रत्येक देशाच्या प्रगतीत त्या देशाचे रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क यांची भूमिका खूप महत्त्वाची असते हे स्पष्ट करतानाच भारताच्या सुदैवाने आपल्याकडे खूप चांगले रेल्वे नेटवर्क असले तरी त्याला विकासाच्या दृष्टीने कधीच प्राथमिकता दिली गेली नाही, हे मोदींनी स्पष्ट केले. जगभरातील सर्वच देशांत इलेक्ट्रिक इंजिनाचा वापर सुरू होऊन कित्येक वष्रे झाली तरी आपल्याकडे अजूनही देशात अनेक ठिकाणी कोळशावरील इंजिनांचा वापर सुरू आहे. रेल्वेचा कधीच पाहिजे तसा तांत्रिक विकास झाला नाही. आजही आपल्याकडे प्रवाशांपेक्षा रेल्वेच्या बोगीचे वजनच जास्त आहे. यामुळे कमी वजनाच्या अत्याधुनिक बोगी गरजेच्या असून, यासारख्या कामांकरिता रेल्वेचे संशोधन केंद्र असावे व त्याला प्रोत्साहन देण्याची गरज मोदींनी व्यक्त केली. एक्स्प्रेस हायवे आणि बुलेट ट्रेन्स यांची नितांत गरज असून, महत्त्वाची बंदरे रेल्वेने जोडणेही तितकेच गरजेचे आहे यामुळे व्यापार उद्योगांनाही चालना मिळेल यासाठी नव्या विचारांनी काम करण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले. पंचवटीतील कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, माजी महापौर बाळासाहेब सानप, नगरसेविका ज्योती गांगुर्डे, शालिनी पवार, रंजना भानसी, नगरसेवक परशुराम वाघेरे, पदाधिकारी श्याम पिंपरकर, दिगंबर धुमाळ, प्रदीप पेशकार, प्रशांत जाधव, रमेश गायधनी आदी उपस्थित होते.


कोण आहे भीष्म कजेरिया
धात्रक फाटा परिसरात राहणारा भीष्म इंटेलक्स सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. मोदींनी त्याच्या प्रश्नाला ज्या पध्दतीने उत्तर दिले त्याबाबत तो समाधानी तर होताच, शिवाय यासारख्या दूरदृष्टी नेत्याचीच पंतप्रधानपदावर नितांत गरज असल्याचे त्याने स्पष्ट केले.


मोदी, नाशिक आणि टाळ्या
देशातील विविध शहरांतील नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना मोदी उत्तरे देत असताना नाशिकचा क्रमांक केव्हा येणार याची उत्सुकता उपस्थितांच्या चेहर्‍यावर दिसून येत होती. लाइव्ह नेटवर्कव्दारे जेव्हा नाशिक अहमदाबादशी जोडले गेले तेव्हा उपस्थितांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. मोदींनी कजेरिया याच्या प्रश्नाला दिलेल्या सर्मपक उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट तर झालाच शिवाय ‘देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो’ अशा घोषणांनी परिसर दणाणला.


मोदींची चौफेर बॅटिंग
गुड गव्हर्नन्स या मुद्यावर मोदींनी या चर्चेत भर दिला. प्रशासनातील अधिकारी आणि कॉर्पोरेट यांची सांगड घालून सरकारी कामकाजात सुधारणा होऊ शकते, यावर भर देतानाच सरकारी योजनांतून मिळणारा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत जाऊन सरकारने दिला पाहिजे. आज मात्र उलटेच होत असून, ही स्थिती सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काळ्या पैशांबाबत त्यांनी ठाम मत मांडताना विदेशातील हा पैसा परत आणण्यासाठी आम्ही सरकार आल्यावर त्वरित टास्क फोर्स तयार करू आणि एक एक पैसा देशात परत आणू. यातून जे लोक प्रामाणिकपणे कर भरतात त्यांना 5 ते 10 टक्के करात सूट दिली जाईल, असे मोदींनी सांगितले. कर वसूल करावा, पण करदात्याला त्याचा त्रास न होता जमा झालेला कर विकासात कसा अधिक चांगल्याप्रकारे पोहोचविता येईल यासाठी त्यांनी चाणक्याने दिलेले फुलावरून मध गोळा करणार्‍या मधमाशीचे उदाहरण दिले, यामुळे उपस्थितांत हजरजबाबी मोदी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती.


हे वापरले गेले तंत्रज्ञान
सीएजी या संस्थेच्या वेबसाइटवर ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाकरिता ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. येथे कोठे कार्यक्रम हवा याचा अर्ज भरून दिल्यानंतर संस्थेकडून संबंधितांशी संपर्क साधून जागा निश्चित केली जाते. वृत्तवाहिन्या वापरत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर यात केला गेला त्याकरिता उपग्रहाची मदत घेतली गेली. वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅनवर वापरला जाणारा अँटिना आणि व्हिडिओकॉनची डिश याकरिता वापरली गेली. अजून याच प्रकारचा कार्यक्रम शहरात आठ वेळेस आयोजित केला जाणार आहे.