आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फवारणीच्या खर्चाचा नुसताच धूर, नगरसेवकांच्या अाग्रहास्तव खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डासांचा वाढता उपद्रव राेखण्याच्या नावाने शहरात करण्यात येणाऱ्या धुरळणीचा काेणताही फायदा हाेत नसल्याची बाब जागतिक अाराेग्य संघटनेने पाच वर्षांपूर्वीच मान्य केली अाहे. धुरळणीची उपाययाेजना केवळ बंदिस्त सदनिकांमध्ये परिणामकारक ठरत असते. बंदिस्त खाेल्यांमध्ये डासांना बाहेर पडण्यास संधी मिळत नसल्याने धुरळणीचा त्यांच्यावर माेठा परिणाम हाेताे. मात्र, खुल्या जागेत करण्यात येणाऱ्या धुरळणीमुळे डास अन्यत्र उडून जातात. त्यामुळे डासांच्या प्रमाणात घट हाेतच नसल्याचे निदर्शनास येत अाहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत डासांच्या उपद्रवाचा मुद्दा गाजला हाेता. याच महासभेत मच्छरदाणी अांदाेलनही करण्यात अाले हाेते. त्यावेळी स्पष्टीकरण देताना अायुक्तांनी धूर फवारणी ही खुल्या जागेत परिणामकारक ठरत नसल्याचे स्पष्ट केले हाेते. डासांच्या अळ्या मारणे हाच डास निर्मूलनाचा उत्तम उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले. अायुक्त स्वता डाॅक्टर असल्यामुळे त्यांच्या या माहितीला विशेष महत्त्व प्राप्त हाेते. परंतु, धुरळणीविषयी शास्त्रशुद्ध माहिती महापालिका प्रशासनाला माहीत असतानाही या व्यवस्थेवर दरवर्षी लाखाेंचा खर्च केला जात असल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे.
पाचवर्षांपूर्वी विचार झाला असता तर वाचले असते काेट्यवधी
धुरळणीनंतरही डासांची संख्या कमी हाेत असल्याचे निदर्शनास अाल्यानंतर पाच ते सहा वर्षांपासून वारंवार महासभा, स्थायी समिती, प्रभाग समिती बैठकांमध्ये सदस्यांनी याबाबत अाेरड केलेली अाहे. तत्कालीन अाराेग्याधिकारी डाॅ. काेंडीराम पवार हेदेखील धुरळणीचा खर्च पाण्यात जात असल्याचे वारंवार सांगत हाेते. परंतु त्यांच्या बाेलण्याला काेणी गांभीर्याने घेतल्याने धूर फवारणीत अाजवर काेट्यवधींचा खर्च वाया गेला अाहे.

राज्यशासनाचे उलटे धाेरण
एकीकडे जागतिक अाराेग्य संघटनेने खुल्या जागेवरील धूर फवारणीला कुचकामी ठरविले असताना दुसरीकडे राज्य शासन मात्र अजूनही धूर फवारणीच्या उपाययाेजनेचे समर्थन करीत अाहे. शासनाच्या निर्देशानुसार डास निर्मूलनाच्या प्रमुख उपाययाेजनांमध्ये धूर फवारणीचा समावेश हाेताे.

पुण्यातही धूर फवारणीस बंदी
पुणे महापालिकेने धूर फवारणीस बंदी घातली अाहे. यापूर्वी महापालिकेत नियमितपणे धूर फवारणी केली जात हाेती. मात्र, त्यातून डासांचा नायनाट हाेण्याएेवजी प्रदूषणातच अधिक वाढ हाेत असल्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळाला लक्षात अाले. त्यातून मंडळाने धूर फवारणीला मज्जाव घातला. दरम्यान, पुण्यात काही ठिकाणी धूर फवारणीसाठी राॅकेलचा वापर करण्यात येत असल्याच्याही तेथील प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या.

मुंबईत धूर फवारणी बंद करण्याची मागणी
धूर फवारणीचे दुष्परिणाम बघता मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी धूर फवारणीची व्यवस्था बंद करण्याची जाेरदार मागणी केलेली अाहे. धूर फवारणीएेवजी अाैषध फवारणीवर अाराेग्य विभागाने लक्ष केंद्रित करावे, असेही संबंधितांनी म्हटले अाहे.

अनियमित घंटागाड्याही डासांच्या उच्छादाचे कारण
नदीपात्रात वाढलेली पाणवेली ही डासांच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण असल्याचा दावा प्रशासनाकडूनच केला जात अाहे. अाैषध फवारणी हा त्यावर एकमेव पर्याय असल्याचेही सांगितले जात अाहे. मात्र, पाणवेलीबराेबरच अनियमित घंटागाड्यादेखील डासांच्या उपद्रवाचे मुख्य कारण अाहे, याकडे मात्र प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. घंटागाड्या राेजच्या राेज येत नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात अाणि त्यामुळे डासांचा उच्छाद वाढताे. अाजमितीस काेणत्याही प्रभागात नियमितपणे घंटागाडी येत नाही. त्यामुळे डासांचा उच्छाद वाढला अाहे. वैशाली पाटील, जीवशास्त्रज्ञ,महापालिका

लहानग्यांसह ज्येष्ठांना होतो धुरळणीचा त्रास
^लहानमुलांचीत्वचा आणि श्वसनाशी संबंधित भाग अत्यंत नाजूक असतात. अशात त्यांना धुरळणीमुळे त्वचेसह श्वसनाचे विकार जडू शकतात. ज्येष्ठांनाही दमा वा जीव गुदमरण्यासारखा त्रास होऊ शकतो. - डॉ. राहुल सावंत

अाैषध फवारणीचा खर्च वाढवावा
^धुरळणीच्या खर्चा एेवजी अाैषध फवारणी वरील खर्च वाढविण्यात अाला, तर त्याचा परिणाम अधिक चांगला हाेऊ शकताे. त्यामुळे यापुढे तरी प्रशासनाने याची काळजी घ्यायला हवी. -डाॅ. दीपाली कुलकर्णी, नगरसेविका

डेल्टा मिथिलाॅनचे मिश्रण घातक
३५ लिटर डिझेलमध्ये १५० मिलीलिटर इतके "डेल्टा- मिथिलॉन’ हे रासायनिक द्रव्य मिसळून धूर फवारणी केली जाते. डास मारण्यासाठीच धूर फवारणी होते, असा अनेकांचा आजही समज अाहे. मात्र डिझेल, अर्धा लिटर पेट्रोल आणि डेल्टा-मिथिलॉनचे हे मिश्रणच शरीरासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

डास निर्मूलनासाठी केला जाणारा खर्च
वर्ष - खर्च ( रुपये लाखांत)
२०११-१२ २४५.०५
२०१२-१३ २३६.०७
२०१३-१४ २४८.५०
२०१४-१५ २८०.००
२०१५-१६ ७००.००
गर्भावर परिणाम हाेत असल्याचा काेल्हापूर पालिकेचा निष्कर्ष
गल्लीबोळांतील धूर फवारणीचा परिणाम थेट गर्भावर होत असल्याचा निष्कर्ष काेल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढल्याने भागाभागांतील धूर फवारणी यंत्रणा आता कायमस्वरूपी बंद करण्यात अाली अाहे. गर्भवतीच्या नाकातोंडातून धूर गेल्यास मूल विकलांग जन्मास येण्याची भीती असल्याने धूर फवारणी यंत्रे (फॉगिंग मशीन) बंद केल्याचा अहवाल तेथील कीटकनाशक अधिकाऱ्यांनी सादर केला हाेता.

प्रदूषणात माेठी वाढ...
धूर फवारणीमुळे डास निर्मूलन, तर दूरच उलट प्रदूषणातच माेठी वाढ हाेत असल्याचे निदर्शनात येते. धूर फवारणी वारंवार केल्याने श्वसनाचेही विकार जडू शकतात, असे अनेक वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
थेट प्रश्न
‘धूर फवारणीची व्यवस्था ही खुल्या जागेतील डास मारण्यासाठी परिणामकारक नाही, एक जबाबदार डाॅक्टर म्हणून मी ही बाब अवगत करून देत अाहे’ असे महापालिकेचे दस्तुरखुद्द अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी काही दिवसांपूर्वी महासभेत स्पष्ट केले खरे. मात्र, तरीही धूर फवारणीच्या नावाने शहरात अाजही लाखोंची उधळपट्टी हाेत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत अाढळून अाले अाहे. यापूर्वीदेखील जागतिक अाराेग्य संघटनेने खुल्या जागेवरील धूर फवारणी बंद करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या अाहेत. मात्र, तरीही राजकीय चमकाेगिरीसाठी धूर फवारणीच्या कुचकामी पर्यायाचा वापर केला जात अाहे. या अनाेख्या उधळपट्टीवर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
राजकीय चमकाेगिरीसाठी अाैषधाएेवजी धूर फवारणीच्याच कुचकामी पर्यायाचा वापर
गेल्या काही वर्षांमध्ये काेट्यवधी रुपयांचा चुराडा...
{ धूर फवारणी कधी उपयुक्त ठरते?
-ज्या वेळी डेंग्यू वा तत्सम अाजाराचे प्रमाण वाढते त्यावेळी डास मारण्यासाठी धूर फवारणीचा वापर व्हावा, असे शास्त्र सांगते.
{खुल्या वातावरणात धूर फवारणी परिणामकारक ठरते का?
-धूर फवारणी ही खुल्या जागेत केल्यास डास इतरत्र उडून जातात. त्यामुळे धुरळणीमुळे फारसा परिणाम साध्य हाेत नाही. या उलट धूर फवारणी बंदिस्त जागेत झाल्यास त्यात डासांचे निर्मूलन हाेते. मात्र, धूर फवारणीनंतर सुमारे २० मिनिटे संबंधित खाेली बंद ठेवणे अनिवार्य असते.
{धूर फवारणीचा फारसा उपयाेग हाेत नसतानाही त्याचा वापर का हाेताे?
-धूर फवारणीसाठी नगरसेवक अाग्रही असतात. त्यामुळे फवारणी करावी लागते.