नाशिक- मध्य रेल्वेने मंजूर केलेल्या मनमाड- मालेगाव- धुळे - नरडाणा- इंदूर आणि नाशिकरोड ते पुणे रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. मात्र, अद्यापही हे काम सुरू झाले नाही. त्यामुळे तोंडावर आलेल्या कुंभमेळ्यात साधुसंतांसह नागरिकांची गैरसोय होईल, म्हणून मंजुरी दिलेल्या कामाची त्वरित सुरुवात करावी यासाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली.
2015 मध्ये कुंभमेळा सुरू होत असल्याने नाशिकरोड, ओढा, मनमाड, देवळाली रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण करून एक्सलेटर बसविणे, राजधानी दर्जाची एलटीटी निझामुद्दीन ही गाडी दररोज करण्यात यावी, नांदगाव ते मुंबईला जाण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करण्यात यावी, या मागण्यांचा त्यात समावेश होता. यावेळी जळगावचे खासदार ए. टी. पाटील, भूषण कासलीवाल, अजय ठोके आदी या वेळी होते. दरम्यान, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील ओझरनजीक उड्डाणपूल उभारण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून निवेदन देण्यात आले.