आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमुक्ती, हमीभाव न दिल्यास शेतकऱ्यांचा दिल्लीत एल्गार, राजु शेट्टींचा सरकारला इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘शेतकऱ्यांच्या अपेक्षा अनंत अाहेत, मात्र सरकारने कर्जमुक्ती आणि कृषी मालाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट अधिक दर या दाेनच मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा १८ जुलै राेजी दिल्लीत शेतकऱ्यांच्या एल्गार पाहण्यास तयार राहावे,’ असा इशारा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे निमंत्रक खासदार राजू शेट्टी यांनी साेमवारी सरकारला दिला.   
 
शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने नाशिकमध्ये शासनाच्या फसव्या कर्जमाफी घोषणेच्या निषेधार्थ एल्गार सभेचे आयोजन केले होते. या वेळी शेट्टी म्हणाले की, ‘राज्य व केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर चालते. मात्र हे सरकार भांडवलदारांच्या फायद्याचे निर्णय घेत आहे. राज्यात शेतकरी एक झाल्याचे पाहून आता देशातील शेतकरी एक होत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण कोरा करून हमीभाव द्यावा. शेतकऱ्यांनी आता फोडाफोडीच्या राजकारणाला बळी न पडता एकजूट होऊन लढा देण्याची हीच वेळ आहे. १८ जुलै रोजी दिल्लीमध्ये देशभरातील शेतकरी एकत्रित होऊन आपल्या मागण्या मांडणार आहेत. त्या वेळी शेतकऱ्यांनी दिल्लीला यावे,’ असे आवाहन शेट्टी यांनी केले.  महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये गोळीबारात झालेल्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांचे अस्थिकलश घेऊन आम्ही संघर्षयात्रा सुरू केली आहे.  १८ जुलै रोजी दिल्लीत जाईल. या वेळी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कलशाला अभिवादन करा, मग सभागृहात जाण्यास सांगणार असल्याचे  शेट्टी यांनी सांगितले.   
 
फसव्या कर्जमुक्तीची करणार जनजागृती
राज्य सरकारने शेतकऱ्यांनी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती करण्याची घोषणा केली. मात्र किचकट अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या या फसव्या कर्जमुक्तीच्या घोषणेविरोधात जनजागृती करण्याचा निर्णय सुकाणू समितीने घेतला. त्यासाठी ११ जुलै रोजी विक्रमगड, १३ जुलै संगमनेर, १४ जुलै साक्री, १५ जुलै अमरावती, १६ जुलै बुलढाणा, १७ जुलै वर्धा, हिंगोली, वाशीम, अकोला,  १८ जुलै नांदेड, १९ जुलै परभणी, २० जुलै बीड, २१ जुलै कोल्हापूर, २२ जुलै सोलापूर आणि शेवटी २३ जुलै येथे पुणे जिल्ह्यात एल्गार सभा घेणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...