आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससीचा पेपर वेळेआधीच गुंडाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत मराठा हायस्कूल केंद्रावरील ब्लॉक नंबर 9 मध्ये परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वीच 10 मिनिटे आधीच पेपर परीक्षार्थींकडून संकलित करण्यात आल्याने परीक्षार्थींनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील काही परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळावर मात करीत आयोगाने अत्यंत चांगल्या पद्धतीने या वेळी परीक्षेचे नियोजन केले होते. असे असतानाच केंद्रचालकांनी त्यावर
विरजण घालत गोंधळाची परंपरा कायम ठेवली.

आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक आणि तहसीलदार यांसह विविध पदांसाठी रविवारी परीक्षा झाली. बदललेल्या अभ्याक्रमानुसार दोन सत्रांत परीक्षेचे विभाजन करीत दोन पेपर घेण्यात आले. त्यातील पहिला पेपर सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत घेण्यात आला. त्यातील पहिला अर्धा तास म्हणजे 10.30 ते 11 हा वेळ सूचना कालावधीसाठी देण्यात आला होता. त्यानुसार, अगदी वेळेत तो पेपर देण्यात आला. मात्र, दुपारी 1.30 वाजेला पेपर परत घेण्याची वेळ असताना सूचना घंटी वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना केवळ सूचना देण्याऐवजी या केंद्रातील पर्यवेक्षकांनी थेट पेपरच जमा करून घेतला. परीक्षा वर्गाच्या बाहेर पडल्यानंतर इतर वर्गांमध्ये विद्यार्थी पेपर लिहीत असल्याचे ब्लॉक 9 मधील 24 विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वेळ तपासली असता, जवळपास दहा मिनिटे आधीच पेपर जमा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी ती वेळ वाढवून मिळण्याची मागणी करीत संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादीने दिले केंद्रप्रमुखांना निवेदन : ब्लॉक नंबर 9 मधील विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत पेपर लिहिण्यासाठी दहा मिनिटे कमी देण्यात आली आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला असून, दहा मिनिटे वाढवून द्यावे किंवा त्यांचे नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रप्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीचे पंचवटी विभाग अध्यक्ष देवांग जानी, युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष धीरज मगर, छावाचे प्रमोद बोरसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला न्याय द्यावा
पहिला पेपर 10.30 वाजता देण्यात आला. प्रश्नपत्रिका 11 वाजता दिली. 1.30 वाजता सूचना बेल झाली तेव्हाच म्हणजे दहा मिनिटे आधी पेपर घेतला. इतर ब्लॉकमधील विद्यार्थ्यांनी तो पूर्ण वेळ लिहिला. आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी परीक्षार्थी शीतलराणी चित्ते, अन्सारी साबा, हर्षल बोरसे, राजकुमार विजय पाटील आदींनी केली आहे.

नऊ हजार परीक्षार्थी उपस्थित
नाशिकमध्ये एकूण 30 केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 9 हजार 27 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 11 हजार 371 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असताना, त्यातील 2 हजार 344 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले. दुसरा पेपर 3.30 ते 5.30 वाजेदरम्यान झाला. त्याला मात्र कुठलीही समस्या न येता पेपर वेळेत पार पडला.