आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतल बससेवा पडणार कायमची ‘थंड’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘शीतल’ बससेवेतील बसेसची वातानुकूलन यंत्रणा दर आठवड्याला वारंवार बंद पडत असल्याने या बसेस कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. ‘वॉरंटी’ कालावधीतच या बसेसची वातानुकूलन यंत्रणा वारंवार बंद पडत असूनही या बसेस कंपनीच्या माथी न मारता तशाच चालविण्याचा प्रताप सुरू आहे. आता नाशिक-पुणे मार्गावरून या बसेस काढून घेऊन मुंबईत ‘चालवण्याचा’ डाव खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकहून पुण्याला आणि पुण्याहून नाशिकला दररोज प्रत्येकी चार अशा आठ फेर्‍या परिवहन विभागाकडून सुरू करण्यात आल्या होत्या. मागील वर्षी ऐन उन्हाळ्यात ही ‘शीतल’ सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला असताना प्रत्यक्षात ही बससेवा नाशिकमध्ये सुरू व्हायला गतवर्षीचा पावसाळा उजाडला होता. त्यामुळे आवश्यक त्या काळात ही ‘शीतल’ सेवा नागरिकांना मिळालीच नाही. महामंडळाच्या बेपवाईमुळे ऐन उन्हाळ्यातही माफक दरात शीतल बसच्या ‘शीतल’ प्रवासाचा आनंद नागरिकांना मिळालाच नाही.

काचा उघड्या राहिल्याने बंद पडते ‘एसी’ यंत्रणा
मुळात एसी बस म्हटले की, तिची खिडकी चालू-बंद करता येऊ नये, अशाच प्रकारची असते. मात्र, शीतल बसच्या बांधणीपासूनच बसची खिडकी चालु-बंद करता येत होती, जी चुकीची होती. काही प्रवाशांनी खिडकी उघडी ठेवल्यानेच ‘एसी’ बंद पडण्याचे प्रकार घडल्याचे परिवहन महामंडळाने म्हटले आहे.

सर्वच शीतल बसचे ‘एसी’ सध्या बंदच
नाशिक-पुणे मार्गावरील सर्वच शीतल बसची वातानुकूलन यंत्रणा सध्या बंद पडलेली आहे. वर्षभरापासूनच या बसेस वारंवार बंद पडत होत्या. त्यामुळे बसबाबत सातत्याने तक्रारी असून, त्या या मार्गावरून कायमस्वरूपी बंद करण्याचा विचार आहे. आर. ए. देवरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक

वॉरंटी कालावधीतही परत केल्या नाहीत बसेस
प्रख्यात आंतरराष्ट्रीय कंपनीकडून या बसेसची खरेदी केल्यानंतर या बसेसला दोन वर्षांची वॉरंटी देण्यात आली होती. सध्या या बसेस वॉरंटी कालावधीत असूनही त्या संबंधित कंपनीच्या माथी न मारता या गाड्यांची वातानुकुलीत यंत्रणा दुरुस्ती करून घेण्यातच समाधान मानले जात होते. दुरुस्तीसाठी कंपनीला स्वतंत्र देयकेदेखील अदा करण्यात आली आहेत. म्हणजेच वॉरंटी कालावधीत असूनही यंत्रणा नादुरुस्त होणार्‍या या बसेस महामंडळ कुणाच्या दबावामुळे ‘चालवून’ घेते आहे, हा प्रश्न पडतो.