आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमएसडब्ल्यू’ कोर्सची होणार आता फेररचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मास्टर इन सोशल वर्क (एमएसडब्ल्यू) अभ्यासक्रमाच्या त्रुटींबाबत जबाबदारी निश्चितीसाठी गठित समितीच्या दोन बैठका झाल्या असून त्यांना 15 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच एमएसडब्ल्यूच्या अभ्यासक्रमाची फेररचनादेखील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुक्त विद्यापीठाच्या एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाच्या वृत्त मालिकेनंतर कुलसचिवांनी जबाबदारी निश्चितीसाठी समिती गठित करण्यात आली होती. या चौकशी समितीत निवृत्त न्यायाधीश, समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आणि विद्यार्थी प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला असून, समितीच्या दोन बैठकादेखील झाल्या आहेत. मात्र, त्या बैठकांमधून अद्याप अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य झाले नसल्याने त्या समितीला 15 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिले आहेत.

अभ्यासक्रमाला लागली तीन वर्ष
या अभ्यासक्रमाची पुस्तकेच तयार नसताना पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलने केल्यानंतरही त्यांना पुस्तके दिली नाहीत. त्यामुळे पहिल्याच वर्षी त्यातील बहुतांश विद्यार्थी नापास झाले. त्यानंतरच्या आंदोलनानंतर त्यांना द्वितीय वर्षात प्रवेश देण्यात आला. दुसर्‍या वर्षीदेखील पुस्तके न मिळण्याची समस्या जानेवारीपर्यंत होती. जी पुस्तके दुसर्‍या वर्षी देण्यात आली, त्यातील केवळ काही पुस्तकांमधीलच प्रश्न आले असा दावा विद्यार्थ्यांनी केला होता. तसेच प्रत्यक्षात 24 महिन्यांच्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रत्यक्षात मुक्त विद्यापीठाकडून 36 महिन्यांचा कालावधी लावण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले.

फेररचनेनंतरच प्रारंभ
एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाची पुस्तकेच छापली नसताना घिसाडघाईने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. या नियोजनशून्य कारभारामुळे हा अभ्यासक्रमच बंद करण्याची वेळ विद्यापीठावर आली. त्यामुळे आता या अभ्यासक्रमाच्या फेररचनेनुसार पुस्तके तयार झाल्याशिवाय हा अभ्यासक्रम सुरू न करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.