आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीबाजार स्थलांतरास सरसावले सर्वपक्षीय, पर्यायी जागा देण्याची सर्वांनीच केली मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा चौफुलीवर समांतर रस्त्याच्या कडेलाच अनधिकृतपणे भरणाऱ्या भाजीबाजाराच्या प्रश्नाचा ‘दिव्य मराठी’ने पाठपुरावा केल्यानंतर आता सर्वपक्षीय नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेत पर्यायी जागेत भाजीबाजार स्थलांतरित करण्याची मागणी केली अाहे. त्यासाठी महापालिकेच्या ओपन स्पेस असलेल्या जागांचा पर्याय स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आल्याने भाजीबाजाराचा प्रश्न सुटू शकणार अाहे.महापालिका प्रशासनाने पर्यायी जागांची पाहणी करून त्याबाबत निर्णय घेण्याची मागणीही सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दुर्घटनेची शक्यता

शहरातील द्वारका चौफुलीनंतर महामार्गावरील पाथर्डी फाटा चौफुलीवर सर्वाधिक वर्दळ असते. अंबड अौद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांचीही मोठी वर्दळ असते. कामगार, शेतकरी, स्थानिक रहिवासी यांचीही वर्दळ असल्याने सायंकाळी हमखास वाहतूक कोंडी होते. परिणामी या चौफुलीवर दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली असून, भाजीविक्रेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. या चौफुलीवर यापूर्वीही अनेक अपघात झालेले आहेत. त्यामुळे भाजीबाजाराचे अतिक्रमण हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या भाजीबाजाराबाबत ठोस कार्यवाही नेमकी केव्हा केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सुसज्ज भाजीमार्केट उभारणार
पाथर्डी परिसरातील शेतकरी भाजीविक्रेत्यांना भाजीपाला विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज भाजीमार्केटचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर भाजीमार्केट उभारण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल. -सुदाम कोंबडे, नगरसेवक

शेतकऱ्यांना राखीव जागा देण्याची गरज
रस्त्याव रभरणारा भाजीबाजार धोकादायक असून, अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी जागेत भाजीबाजार स्थलांतरित करण्यात यावा. मात्र, त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी राखीव जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी. संजयनवले, माजी नगरसेवक

पर्यायी जागेत केले जावे स्थलांतर
अनधिकृतपणे भरणाऱ्या भाजीबाजाराला आमच्या पक्षाचा विरोध असून, महापालिकेने भाजीविक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. पाथर्डीरोड परिसरात महापालिकेचे ‘ओपन स्पेस’ असून, त्या ठिकाणी येथील भररस्त्यातील भाजीबाजार स्थलांतरित करता येईल. सोमनाथबोराडे, विभाग उपाध्यक्ष, राष्ट्रवादी

कुणावरही अन्याय व्हायला नको

पाथर्डी फाटा चौफुलीवर भरणाऱ्या भाजीबाजाराला आम्ही विरोध केला आहे. रस्त्यावर भाजीबाजार सुरू राहिल्यास एखादी दुर्घटनाही घडू शकते. परंतु, या ठिकाणी पाथर्डी पंचक्रोशीतील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणत असल्याने ग्राहकांनाही स्वस्त ताजा भाजीपाला मिळतो. त्यामुळे भाजीबाजार बंद करू नये. शेतकऱ्यांवर अन्याय करता तो पर्यायी जागेत स्थलांतरित करण्यात यावा. - सुदाम डेमसे, उपमहानगरप्रमुख, शिवसेना