आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाखाली बल्ली बॅरेकेडिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात शहरात सर्वाधिक भाविक येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने प्रमुख मार्गांवर लोखंडी बॅरेकेडिंगचे नियोजन करतानाच हायवेवर बल्ल्यांच्या सहाय्याने बॅरेकेडिंग लावण्याचे काम सुरू आहे. २९ ऑगस्ट रोजी पहिल्या पर्वणीलाच पोलिसांच्या नियोजनाचा खरा कस लागणार असल्याने, सुरक्षिततेसाठी शक्य त्या सर्व उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
साधुग्राममध्ये भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी मुख्य औरंगाबादरोडसह तपोवनाकडे जाणारे काही मुख्य आणि अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचे नियोजन केले आहे. तसेच, स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन काही ठिकाणी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी नियोजनात काही बदल सूचवत महामार्गावरील रस्त्यांवर बल्लीच्या बॅरेकेडिंगचेही नियोजन केले आहे. त्यानुसार मुंबई नाक्यापासून द्वारका पुढे औरंगाबाद नाक्यापर्यंत बल्ली बॅरेकेडिंग करण्याला वेग आला आहे. पर्वणीकाळात भाविक मार्ग सुरूच राहणार असल्याने भाविकांना शिस्तबद्ध जाण्या-येण्यासाठी हे नियोजन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. साधुग्राम आणि शाहीमार्गाकडे येणाऱ्या सर्व मार्गावरही बॅरेकेडिंग केले जाणार आहे. महामार्ग पादचाऱ्यांसाठी असुरक्षित असल्याने प्रथम उड्डाण पुलाखाली बॅरेकेडिंग केले जात आहे. स्थानिक नागरिकांसह इतरही पादचारी ठरलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करतील. पोलिसांच्या या नियोजनाचा स्थानिकांना पर्वणी काळातच त्रास होणार आहे. त्यामुळे स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

नागरिकांनी पर्वणीत सहकार्य करावे
शाही पर्वणी काळासाठी शहरातील रस्त्यांवर बॅरेकेडिंग करण्यात येत आहे. पर्वणीच्या काळात नागरिकांना काही प्रमाणात त्रास होणार आहे. मात्र, भाविकांसह नागरिकांच्या सुरक्षेसाठीच हे नियोजन आहे. सिंहस्थ निर्विघ्न पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस दलास सहकार्य करावे. एस.जगन्नाथन, पोलिस आयुक्त