नाशिक - मुंबईनाका ते वडाळारोड सिग्नलपर्यंतच्या सेवा रस्त्यावर गॅरेज व्यावसायिक आणि हाॅस्पिटल्सने अतिक्रमणांचा अक्षरश: पसारा मांडला आहे. सेवा रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांसह क्रेन्समुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी कारवाई केल्यास वाहनचालकांची गैरसोय टळेल.
उड्डाणपुलाने शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविला असल्याचे बोलले जात असताना प्रत्यक्षात या पुलाने प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे. परंतु, प्रश्नांची सोडवणूक मात्र झालेली नाही. मुंबई नाका ते वडाळारोड सेवा रस्त्यावरही िनयमांची पायमल्ली करून अतिक्रमणांचे थैमान मांडले आहे. इतकेच नाही, तर सेवा रस्ता तयार करून प्रशासनाने जणू संबंधित व्यावसायिकांसाठी पार्किंगचीच सोय करून दिली आहे.
कांदा-बटाटा भवनच्या समोर काळ्या-पिवळ्या वाहनांची पार्किंग अडथळा ठरतेय.
गाेदावरी हाॅटेलसमोरील रस्त्यावर ट्रक, खासगी बसेसचा थांबाच तयार झाला आहे.
या सेवा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गॅरेजच्या गाड्या भररस्त्यावरच उभ्या असतात.
नाशिक जिल्हा सहकारी बँकेसमोरून जाणाऱ्या रस्त्यावरही वाहने उभी दिसतात. बँकेने पार्किंगची व्यवस्था केली असली तरीही येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासाठीही पार्किंगची व्यवस्था आहे. मात्र, कार्यालयात मंत्री, पुढारी आल्यास रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे या परिसरातून मार्ग काढणे दुरापास्त होते.
गॅरेजेसची नादुरुस्त वाहनेही रस्त्यावर
परिसरातअसलेल्या गॅरेजेसची वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी केली जातात. ट्रक तर रस्त्यातच उभ्या असतात. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. क्रेन्स आणि रुग्णवाहिकादेखील मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जातात. सेवा रस्त्याच्या बाजूला वाहन विक्रीची चार संकुले आहेत. या संकुलांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात.