नाशिक- द्वारका ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत चाळण झालेला नाशिक-पुणे महामार्ग दुरुस्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एकूण साडेनऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महिन्यापूर्वी रस्तादुरुस्तीची कामेही सुरू करण्यात आली होती. मात्र, पावसामुळे दुरुस्तीचे काम बंद पडले आहे. सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी चार ते पाच फूट लांब, रुंदीचे आणि पाच ते सात सेंटिमीटर खोलीचे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मान व खांद्याच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, दस-यापासून या रस्त्याचे काम सुरू होऊ शकेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
नाशिक-पुणे महामार्ग द्वारकापासून सुरू होऊन चेहेडी शिवपर्यंत महापालिका हद्दीत येतो. त्यामुळे हा भाग महापालिका क्षेत्रात येत असल्याने दुरुस्ती आणि देखभाल करणे महापालिकेच्या अखत्यारित आहे. महापालिकेने महामार्ग दुरुस्तीचे काम आमचे नसून, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे असल्याने आम्ही कोणतीही दुरुस्ती करणार नसल्याचे लेखी कळविले आहे. या दोघांच्या भांडणात मात्र नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या दुर्दशेबाबत ह्यदिव्य मराठी' ने वृत्त प्रसारित केल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्ता रुंदीकरण आणि दुरुस्ती करण्यासाठी एकूण साडेनऊ कोटी रुपये मंजूर करून कामही सुरू केले.ठिकठिकाणी रस्तादुरुस्तीही करण्यास सुरुवात केली होती. परंतु, पाऊस सुरू झाल्याने काम बंद करण्यात आले. मात्र, पाऊस बंद होऊन दोन आठवडे उलटले, तरी काम बंदच आहे. हे काम त्वरित सुरू करण्याची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
खराब रस्त्यामुळे विकारांत वाढ
रस्ता खराब असल्याने दुचाकीस्वारांना खांद्याला आणि मानेच्या स्नायूंना धक्के बसतात. त्यामुळे खांदा आणि मानेच्या आजारांची लागण होते. अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या अलीकडच्या काळात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. रमेश घाडगे, अस्थिरोगतज्ज्ञ विविध कर भरूनही होतेय गैरसोय नाशिकरोड ते द्वारकापर्यंत दुचाकीवरून प्रवास करणे म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासारखे आहे. त्यामुळे शासनाला कर देणाऱ्या नागरिकांची तरी अशी वेळ यायला नको, असे वाटते. संदीप बोराडे, नागरिक