आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,latest News In Divya Marathi

होऊ द्या मतदान, मगच घ्या अनुदान, महापालिका कर्मचा-यांना आचारसंहितेचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या कर्मचा-यांनाही विधानसभा निवडणुकीच्या आहेचारसंहितेचा फटका बसणार असून, मतदान आटोपल्यावर म्हणजे १६ ऑक्‍टोंबर नंतरच त्यांच्या हाती सानुग्रह अनुदान पडण्याची शक्यता आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा १३ हजार १११ रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. दिवाळीच्या सणासाठी कर्मचाऱ्यांना या अनुदानाची प्रतीक्षा असते. गेल्या वर्षीही १३ हजार १११ रुपये अनुदान मंजूर झालेले असताना, तिजोरीच्या नाजूक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांच्या हातात प्रत्यक्षात ११ हजार रुपयेच पडले होते. यंदा तत्कालीन महापौर यतिन वाघ यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता गृहीत धरून आधीच अनुदान जाहीर केले. ‘आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी अनुदान कमी करू नका’, अशी तंबीही त्यांनी दिली. प्रारंभी लेखा विभागाकडून यास नकारघंटा वाजवली जात होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोडावर मनसेने कर्मचाऱ्यांना खूश करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची खेळी खेळली. प्रत्यक्षात मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या कालावधीत अनुदानाचे वितरण करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आयुक्तांनी प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मात्र, या कालावधीत निवडणूक असल्यामुळे आयुक्तांनी मतदानानंतर आचारसंहिता शिथिल होत असल्याचे लक्षात घेत त्यानंतर तातडीने अनुदान वितरित करण्याच्या सूचना केल्या असल्याचे समजते.
29 सप्टेंबरलाच झाले वेतन अदा
22 ऑक्टोंबरपासून दिवाळीला प्रारंभ होणार असल्यामुळे महापालिका प्रशासनाने २९ सप्टेंबरलाच कर्मचा-यांना वेतन अदा केले आहे. कर्मचा-यांना दोन टप्प्यात खर्च करण्यासाठी त्याची मदत होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १६ ऑक्‍टोंबरनंतर अनुदान मिळणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा सणाच्या खरेदीचा भार हलका होईल, असाही आशावाद व्यक्त केला जात आहे.