आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,latest News In Divya Marathi

स्वच्छतेचा ठेका देणार नव्याने, अमूल्य क्लीनअपचा गाशा गुंडाळण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कचरा करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोच स्वच्छता ठेवण्यासाठीही प्रयत्न करणाऱ्या आणखी एका संस्थेला आता शहर स्वच्छतेचे कंत्राट देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने आयुक्तांकडे फाइल पाठवली असून, जेणेकरून तक्रारी असलेल्या अमूल्य क्लीनअपचा गाशाही गुंडाळला जाणार आहे. आरोग्‍य विभागाने निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नी मौन बाळगले आहे.
महापालिका क्षेत्रातील वाढता कचरा उचलण्यासाठी आरोग्‍य विभाग अपयशी ठरला आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शहरातील कचरा उचलण्यासाठी अडीच हजार सफाई कामगारांची गरज असल्याचेही आरोग्‍य विभागाने स्पष्ट केले आहे. एकीकडे अपुरे मनुष्यबळ, घंटागाड्यांबाबत वाढत्या तक्रारी, तर दुसरीकडे नागरिकांना आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आरोग्‍य विभाग मेटाकुटीला आला आहे. त्यात ऑक्‍टोबर महिन्यात डेंग्यूचे 37 संशयित सापडून दहा महिन्यांतील आकडा १०२ पर्यंत गेला आहे. याचप्रमाणे तापाचे रुग्ण वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आता आरोग्‍य विभागाने कचरा करणा-यांवर कारवाईसाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी अमूल्य क्लीनअप या संस्थेला कंत्राट दिले होते. यात संबंधित संस्था दंडातील 60 टक्के रक्कम स्वत:कडे ठेवून ४० टक्के रक्कम महापालिकेला देत होती. तत्कालीन उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या योजनेला नगरसेवकांच्या नाराजीचे ग्रहण लागले. त्यातून पुढे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नागरिकांमध्ये खटके उडू लागले. त्याचा फटका व्होट बँकेला बसेल म्हणून नगरसेवकांनी ‘अमूल्य’चे काम बंद पाडण्याची मागणी केली. असंख्य अडथळ्यानंतरही ‘अमूल्य’चे काम मात्र सुरूच आहे.
अशा परिस्थितीत आता या संस्थेप्रमाणे शहर स्वच्छतेची जबाबदारी घेण्यासाठी आणखी एक संस्था पुढे आली आहेत. या संस्थेने ‘अमूल्य’च्या तुलनेत दंडाबरोबरच शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी उचलण्याचे मान्य केल्याचे समजते. मात्र, आरोग्‍य विभागाने आचारसंहितेमुळे याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. संबंधित संस्थेचा प्रस्ताव आयुक्तांकडे ठेवण्यात आला असून, ‘अमूल्य’चा ठेका संपल्यानंतर संबंधित संस्थेला काम देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
कचरा करणा-यांवर कारवाई
शहरातस्वच्छता ठेवण्यासाठी कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा ठेका अमूल्य क्लीनअप संस्थेला देण्यात आला होता. यातील दंडात्मक कारवाईवरून वाद उद‌्भवल्याने या संस्थेबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या संस्थेचा गाशा गुंडाळण्यात येणार असून, त्या जागी नवीन संस्थेला ठेका देण्यात येणार आहे. नवीन संस्थेने कचरा करणाऱ्यांवर दंड करण्याबरोबरच शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी उचलण्याचे मान्य केल्याचे समजते. यामुळे कचरा करणाऱ्यांवर कारवाईची तयारी आरोग्‍य विभाग सुरू केली आहे.