आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation, Administration Contrast Claim On Water Issue

पाण्याबाबत मनपा, प्रशासनाचे विराेधी दावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाण्याचे प्रतिदिन, प्रतिमाणसी १३५ लिटर वापराचे प्रमाण गृहीत धरल्यास शहरास आवश्यक असलेल्या पाण्यापेक्षा जवळपास ८०० कोटी लिटर पाणी वाढीव असल्याचा दावा खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच केला आहे. एकीकडे नाशिक महापालिकेने केलेल्या सोशल आॅडिट अहवालामध्ये शहरास दररोज २५५ एमएलडीच्या आवश्यकतेनुसार पाणी दिल्यास ४९ दिवसांचा तुटवडा निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या या परस्परविरोधी दाव्यांमुळे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींदरम्यान वाद तर वाढेलच. पण, शहरवासीयांना जूनपर्यंत पुरेसे पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठवाड्यास पाणी सोडल्यानंतरही शहर आणि जिल्हावासीयांना पाण्याचा तुटवडा भासणार नाही. परंतु, त्यांनी त्यासाठी पाणी नियमाप्रमाणे काटकसरीने वापरावे, अशी भूमिका पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. त्याची दखल घेत महापालिकेने शहरासाठी धरणांत उपलब्ध असलेले पाणी, गरज आणि त्याची गळती असा सर्वच अभ्यास समाविष्ट असलेले सोशल ऑडिट केले. त्यात पालकमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार १३५ लिटर प्रतिमाणसी, प्रतिदिन याप्रमाणेही पाणी दिल्यास तब्बल ४९ दिवसांसाठी पाणीच शिल्लक राहात नसल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मात्र १३५ लिटरच्या मानकानुसार मनपास ३१ जुलैपर्यंत पाणी पुरणार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेसाठी गंगापूर धरणात सध्या २५०० दशलक्ष घनफूट, तर दारणात २७० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. म्हणजे एकूण २७०० दशलक्ष घनफूट उपलब्ध असलेले पाणी ३१ जुलैपर्यंत २० लाख लोकांना सहज मिळू शकणार असल्याचा हिशेबच त्यांनी मांडला. त्यात २७० कोटी लिटर पाणी दररोज शहरास लागणार आहे.
असे ३१ जुलैपर्यंत म्हणजे २०० दिवसांसाठी प्रतिदिन २७० कोटी लिटरनुसार ५४ हजार कोटी लिटर पाणी लागणार आहे. २७०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याचा पाण्याचा विचार केला तर जवळपास सर्वांनाच पाणी देऊनही ८०० कोटी लिटर पाणी जादा असल्याचे कुशवाह यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे महापालिकेने मात्र प्रतिमाणसी १३५ लिटर या निकषानुसार लोकसंख्याही ५० हजारांनी कमी धरत १९ लाख ५२ हजार ६०९ नागरिकांनाच उपलब्ध असलेले पाणी दिले तरी शेवटचे ४९ दिवस पाणीच राहात नसल्याचे जाहीर केलं. त्यामुळे पाणीकपात १५ वरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याबाबत महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे आकडे आणि गुणोत्तर यात पूर्णपणे विरोधाभासच दिसून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये मिळणाऱ्या पाण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

सूचना पाणीगळती, अपव्यय राेखण्याची
माझ्या माहितीनुसार मनपाकडे २० लाख लोकांना दरराेज, प्रतिमाणसी १३५ लिटरप्रमाणे ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. यंदा परिस्थिती चिंताजनक असल्याने मनपाला गळती, पाण्याचा अपव्यय कमी करावा लागेल. तशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. - दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी
पुढे वाचा.. अाठवड्यातून दाेन दिवस ‘पाणी बंद’चा महापालिकेचा प्रस्ताव