आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Commissioner Not Well Behaving Corporators

आयुक्तांकडून नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आयुक्तांकडून नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने सर्वसामान्यांशी ते कसे वागत असतील असा प्रश्न उपस्थित करत याबाबत आपण शासनाकडे तक्रार करणार असल्याचे व्यक्त करत उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्त संजय खंदारे यांच्या कामकाजाविषयी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली.

खंदारे यांच्याकडे एका सामाजिक संस्थेच्या बांधकामाविषयी फाइल्सची विचारणा केली असता यासंदर्भात आयुक्तांकडून योग्य सहकार्य न मिळता उलट त्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगत कुलकर्णी म्हणाले की लोकप्रतिनिधी हे शहरातील विविध व्यक्ती, संस्थांच्या कामांविषयी महापालिकेत अधिकार्‍यांकडून सहकार्याची अपेक्षा करत असतात. मात्र, संबंधित कामे ही जणू काही आमच्या घरातीलच असल्यासारखे आयुक्तांकडून वारंवार नगरसेवकांकडे पाहिले जाते. तसेच कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाहीत.

तत्कालीन आयुक्त बी. डी. सानप यांनी मंजूर केलेल्या फाइल्सबाबतही खंदारे यांच्याकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने प्रभागातील विकासकामे खोळंबली आहेत. सिंहस्थाविषयीदेखील आयुक्तांची अत्यंत धिम्या गतीने कामे सुरु असल्याने आज कुंभमेळ्याचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे पहायला मिळत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

आयुक्तांकडून यापूर्वी देखील अनेक नगरसेवकांना अशाच स्वरूपाची वागणूक मिळालेली आहे. तासन्तास त्यांच्या कार्यालयाबाहेर भेटीची प्रतीक्षा करावी लागते. नगरसेवकांचीच ही अवस्था असेल तर तिथे सामान्य नागरिकांना आयुक्त किती भेटत असतील हा शोधाचाच भाग आहे. यासंदर्भात आपण वरिष्ठ तसेच शासनाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.