आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Election Mns Politics Nashik

‘मनसे’चे गुणवान ठरले अखेर उनाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेने इच्छुक उमेदवारांची निवड रितसर परीक्षा घेऊन केली होती. त्यात गुणवत्तेचे निकष लावण्यात आले होते. यातून तावून-सुलाखून निघालेल्यांना उमेदवारी देण्यात आली होती. इतकी मेहनत घेऊनही पक्षबैठकीसह महासभेला दांडी मारण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा नगरसेवकांवर पक्षीय कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय सत्ताधारी मनसेने घेतला आहे. त्या संदर्भात गटनेत्यांनी शिस्तपालनाच्या सूचना देणारे एक पत्रकच प्रसिद्ध केले आहे.

उमेदवार निवडीच्या वेळी इच्छुकांची शहर विकासाची दृष्टी व पालिका कामकाजासंदर्भातले ज्ञान तपासण्यासाठी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार परीक्षा घेतली जात असल्याचे स्पष्टीकरण मनसेने दिले होते. यानंतर दर महिन्याला मनसेच्या नगरसेवकांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही. याचा फायदा घेत नगरसेवकांनीही तसे वर्तन करण्यास प्रारंभ केला. हे वेळीच थांबवण्यासाठी गटनेते अशोक सातभाई यांनी नगरसेवकांना महासभा व पक्षीय बैठकांना उपस्थित न राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी पत्रकान्वये दिला आहे. खुद्द राज ठाकरे यांच्याही कानावर गेल्याने त्यांनी ताज्या दौर्‍यात पदाधिकार्‍यांना याबाबत जाब विचारला होता.

संख्येअभावी हतबल
गेल्या आठवड्यातील महासभेत शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादीने परसेवेतील अधिकार्‍यांच्या मुद्यावरून सत्ताधारी गटाला कोंडीत पकडले होते. विरोधक व सत्ताधार्‍यांतील वाक्युद्धात सत्ताधारी नगरसेवकांची संख्या कमी पडत असल्यानेच विरोधक मात करत असल्याचे चित्र त्यावेळी स्पष्ट झाले होते.

आपोआप अभ्यास
महासभेसह पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. महासभेला पूर्णवेळ उपस्थित राहिल्यास अनेक विषयांचा आपोआप अभ्यास होतो. अशोक सातभाई, गटनेता, मनसे