आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Election Seats Issue Nashik

नाशिकमधील जागा वाटपाबाबत आज चर्चा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नाशिक - मुंबईपाठोपाठ ठाणे, नाशिक, नागपूर, उल्हासनगर महापालिका निवडणुकीतही आघाडी करण्याच्या निर्णयावर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी रात्री बैठकीत शिक्कामोर्तब केले. नाशिक महापालिकेतील जागावाटपाबाबत गुरुवारी बांधकाममंत्री छगन भुजबळ व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे चर्चा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली.
मुंबईतील दोन प्रभागांबाबत दोन्ही कॉँग्रेसमध्ये एकमत न झाल्याने अद्याप जागावाटप जाहीर झालेले नाही. आता राज्यातील दहापैकी पाच महापालिकांत दोन्ही कॉँग्रेस आघाडीने लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोन्ही कॉँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. जागावाटपाचा प्रश्न चर्चेतून सोडवणार असून, त्याचा आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पिचड यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये मित्रपक्षांशी चर्चा - नाशिकमध्ये बुधवारी दोन्ही कॉँग्रेसने मित्रपक्ष माकप, रिपाइंतील कवाडे व गवई गटाशी चर्चा केली. घटक पक्षांच्या जागांचा विचार करून जागावाटपाबाबत निर्णय होईल. जागांच्या आकड्यांपेक्षा मेरीटवर लक्ष केंद्रित असून, घटक वा मित्रपक्षांनाही आघाडीत सामील करून घेण्याचा प्रयत्न आहे, असे कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले. कॉँग्रेसमधील इच्छुकांच्या 20 जानेवारीपासून मुलाखती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही कॉँग्रेसकडून प्रभागनिहाय इच्छुकांची चाचपणी सुरू आहे.
तीन तालुक्यांत ‘आघाडी’ - राष्ट्रवादीने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी तालुकाप्रमुख व निरीक्षकांच्या बैठका भुजबळ फार्म येथे घेतल्या. दिंडोरी, मालेगाव व नांदगावला कॉँग्रेससोबत आघाडी करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली असून, याबाबत अंतिम निर्णय लवकरच होईल, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले. खासदार समीर भुजबळ, आमदार जयंत जाधव यांच्यासह पक्षाचे माजी खासदार, आमदार उपस्थित होते.