आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - महापालिकेतील विविध विभागांच्या कामकाजाविषयी नागरिकांना असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जानेवारीत हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा नि:शुल्क असून नागरिकांकडून उपस्थित होऊ शकणारे संभाव्य प्रश्न लक्षात घेऊन हेल्पलाइनची निर्मिती केली आहे.
नव्या वर्षात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करून महापालिका नागरिकांना मोबाइल अँप्ससह हेल्पलाइनसारख्या उपक्रमांची भेट देणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘सारथी’ या नावाने हा उपक्रम सुरू केला असून, त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेने ही सेवा प्रस्तावित केली आहे. नागरिक रस्ते, पाणीपुरवठा, पथदीप, स्वच्छता, उद्याने, आरोग्यसेवा, करभरणा अशा मूलभूत नागरी सुविधांविषयी अनेकदा माहिती विचारतात. बहुतांश वेळा संबंधित अधिकारी वा कर्मचार्यांची भेट होत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यात त्यांचा वेळही जातो. बर्याचदा कोणती माहिती कुठे विचारावी किंवा मिळू शकते याबाबत कल्पना नसल्याने हा त्रास कमी होण्यासाठी ही हेल्पलाइन उपयोगी ठरणार आहे. त्यासंदर्भात महापालिकेच्या संगणक विभागाने एक स्वतंत्र हेल्पलाइन कार्यप्रणाली प्रस्तावित केली आहे.
दोन सत्रांत हेल्पलाइन; प्रशिक्षित ऑपरेटर्स
प्रायोगिक तत्त्वावर दोन सत्रांत ही हेल्पलाइन राहील. त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटर्सची नेमणूक केली जाईल. हेल्पलाइन सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक राहतील. पालिकेचे कामकाज, विविध अर्ज व आवश्यक कागदपत्रांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अशी असेल हेल्पलाइन
प्रश्नासंदर्भातील चौकटीवर क्लिक करून ऑपरेटर संबंधित प्रश्न वा अडचणीविषयी लगेच माहिती देऊ शकतील, अशी व्यवस्था तसेच डाटा संगणकात टाकण्यात आला आहे. नागरिकांकडून साधारणपणे कोणती माहिती व प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज घेऊन प्रत्येक विभागाशी संबंधित प्रत्येकी 50 प्रश्न (फ्रिक्वेंटली आस्कड् क्वेश्चन्स) तयार केले आहेत. त्यामुळे लगेच उत्तर मिळणार आहे. ऑपरेटर माहितीबरोबरच संबंधित विभागाचे संपर्क क्रमांकही नागरिकांना देतील.
अशा प्रश्नांची मिळणार उत्तरे
1> पूररेषा म्हणजे काय?
2> निळ्या व लाल रेषेत बांधकाम करता येऊ शकते का?
3> रस्त्याच्या कडेला अस्वच्छता करणार्यांविषयी तक्रार कोठे करता येते?
4> मोकाट कुत्र्यांविषयी तक्रार कुठे करायची?
5> प्रॉपर्टी कार्ड कोठे मिळू शकते?
नागरिकांच्या सुविधेसाठी
नागरिकांना अधिकाधिक चांगली सुविधा मिळावी, या दृष्टीने ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक या दोघांचाही वेळ वाचण्यास मदत होईल. संजय खंदारे, आयुक्त, महापालिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.