आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या कारवाईला व्यापारी संघटनांचे पाठबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - व्यावसायिकांच्या एलबीटी चुकवेगिरीला लगाम घालण्यासाठी महापालिकेने कारवाई सुरू केली असली, तरीही त्याबाबत अनेक तक्रारी व्यापारी संघटनांकडे येऊ लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘विरोध कारवाईला नव्हे, अन्यायकारक कारवाईला असेल’, अशी भूमिका महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस व फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ र्मचंटस् (फाम) या दोन्ही व्यापारी संघटनांनी स्पष्ट केली आहे.

नाशिक महापालिका हद्दीत जकातीऐवजी एलबीटी वसुलीला 21 मे 2013 पासून सुरुवात झाली, याच काळात एलबीटी नको, तर मूल्यवर्धित करातून अतिरिक्त एक टक्का कर वसूल करून तो शासनाने पालिकेला द्यावा, अशी मागणी ‘फाम’ कडून करण्यात येत होती. एलबीटीविरोधात आंदोलने सुरू होती. एलबीटी परवान्याकरिता नोंदणी अर्ज भरू नये असे आवाहन ‘फाम’ कडून करण्यात आले होते. दुसरीकडे व्यावसायिकांनी एलबीटी नोंदणी करावी यासाठी महाराष्ट्र चेंबरकडून नोंदणी शिबिरे घेण्यात येत होती. दरम्यान, आता तीन महिने उलटून गेल्यानंतर एलबीटी न भरणार्‍या, करचोरी करणार्‍यांवर पालिकेने कडक कारवाईचे हत्यार उगारले आहे. दंडापोटी लाखो रुपये वसूल करण्यात आले आहेत. मात्र, बेकायदेशीररित्या जर कोणी कर चुकवित असेल, तर त्यांना पाठिंबा न देण्याची भूमिका या दोन्ही संघटनांनी घेतली असल्याने व्यापार्‍यांनी एलबीटी नोंदणी घेऊन कारवाई टाळणेच योग्य असल्याचे चित्र सध्या तरी आहे.

वेळ गेलेली नाही
एलबीटी जाचक असल्याचे सातत्याने सांगत होतो. एलबीटी नको म्हणून आम्ही आंदोलन केले मात्र काही संघटनांनी ते हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. आज ज्यांच्यावर कारवाई होत आहेत ते याच संघटनांशी संबंधित आहेत. आम्ही आजही आवाहन करतो आहोत की अजूनही वेळ गेलेली नाही एकत्र या पुन्हा आंदोलन करू. असे असले तरी बेकायदेशीर कृत्य करणार्‍या व्यापार्‍यांना मात्र मदत करणार नाही. प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष, फाम

तर कारवाईला विरोध
वारंवार आवाहन, विनंती करूनही एलबीटीची नोंदणी अनेकांनी केली नाही, आता कारवाई नंतर नोंदणी करून लोक चेंबरकडे अन्याय झाल्याचे गार्‍हाणे घेऊन येत आहेत, ही व्यापार्‍यांची चूक नाही का? ही आम्हा व्यापार्‍यांची सर्वात मोठी संघटना आहे आणि अन्यायकारक कारवाई महापालिकेने केली असेल, तर आम्ही निश्चित ती सहन करणार नाही. संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष, चेंबर ऑफ कॉर्मस