आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिका जागावाटप; कॉँग्रेसला 64,राष्ट्रवादीला 58

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून कॉँग्रेस आघाडीतील स्थानिक नेत्यांमध्ये बेबनाव उफळून आल्यानंतर गुरुवारी वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत तब्बल आठ तासांची जम्बो बैठक घेऊन जागा वाटपावर अंतिम हात फिरवला. रात्री पाऊणला हाती आलेल्या माहितीनुसार कॉँग्रेसला 64, तर राष्ट्रवादीला 58 जागा देण्यावर एकमत झाले. महाआघाडीतील रिपाइंच्या गवई, कवाडे गटाशी चर्चा करून त्यांनाही जागा वाटपात स्थान दिले जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी स्थानिक पातळीवर कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या समिती सदस्यांची बैठक झाली. यात एका प्रभागातील जागेवरून दोन्ही कॉँग्रेसच्या विशेषकरून शहराध्यक्षांमध्ये वाद झाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी थेट आघाडी तुटल्याचे जाहीर करीत फाईली भिरकवल्यामुळे कॉँग्रेसच्या सदस्यांनी बैठकीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली. स्थानिक पदाधिका-यांमधील विसंवाद व त्यातून थेट आघाडी तुटल्याचे जाहीर करण्याइतपत मजल गेल्यानंतर नेत्यांनी दोन्ही कॉँग्रेसमधील पदाधिका-यांना मुंबईत बोलावून आघाडीबाबत मध्यरात्रीपर्यंत चर्चा केली. पालकमंत्री भुजबळ यांच्या ‘रामटेक’ या निवासस्थानी आघाडीचा खल सुरू होता. तब्बल सहा तास चर्चा केल्यानंतर आघाडीबाबत एकमत झाल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मान्य केले. प्रभागनिहाय प्रत्येक जागेवर चर्चा झाली. विद्यमान नगरसेवक व नसेल तर इलेक्ट्रो मेरीटचा विचार करून जागा निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीला कॉँग्रेसचे संपर्कमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार समीर भुजबळ, आमदार जयप्रकाश छाजेड, जयंत जाधव, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, दिलीप खैरे, डॉ. शोभा बच्छाव, कॉँग्रेसचे निरीक्षक गणेश पाटील आदी उपस्थित होते.
आघाडीवर शिक्कामोर्तब - कॉँग्रेसला 64 तर राष्ट्रवादीसाठी 58 जागा देण्याबाबत एकमत झाले आहे. आघाडीसाठी दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये प्रदीर्घकाळ चर्चेच्या फे-या झाल्या. मात्र, तोडगा निघत नसल्यामुळे मुंबईत वरिष्ठांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात यशस्वी तोडगा निघाला. आघाडीसाठी दोन्ही पक्ष एकदिलाने काम करून मनपावर झेंडा फडकवतील. - समीर भुजबळ, खासदार, राष्ट्रवादी कॉँग्रेस.
जागा निश्चितीकरण अजून बाकी - कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाने केवळ कोणी किती जागा लढवायच्या याबाबत संख्यात्मक वाटप केले आहे. प्रत्यक्षात कोणती जागा कोणाला सोडायची यावर चर्चा बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच रिपाइंतील गवई व कवाडे गटही ‘महाआघाडीसाठी’ इच्छुक असल्यामुळे त्यांचीही शक्ती बघून त्यांना जागा सोडल्या जाणार आहेत.