आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासभा : सीसीटीव्ही खरेदीवरून गदारोळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आपत्कालीन उपाययोजनेच्या नावाखाली 17 कोटी रुपयांच्या ‘सीसीटीव्ही’ खरेदीसाठी तयार केलेल्या संशयास्पद प्रस्तावावरून गुरुवारी महासभेत नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्यावर आरोप करीत, चार कोटींची खरेदी 17 कोटींत करण्यामागचा डाव काय, असाही सवाल करण्यात आला. नगरसेवकांच्या आक्षेपानंतर महापौर यतिन वाघ यांनी प्रस्ताव मंजूर करीत नगरसेवकांच्या सूचनांचा विचार करण्याचे आदेश दिले.

आपत्कालीन उपाययोजनांसाठी शासनाने 10 कोटी रुपये दिले होते. त्यात पालिकेचे सात कोटी रुपये समाविष्ट करून 17 कोटी रुपयांचे कॅमेरे खरेदीचा प्रस्ताव चर्चेला आला. त्यास उद्धव निमसे यांनी आक्षेप घेत, सिंहस्थासाठी शासनाकडून कॅमेरे बसविले जाणार असताना पुन्हा पालिकेने स्वतंत्र खर्च कशासाठी करायचा, असा प्रश्न केला. प्रस्तावात देखभाल-दुरुस्ती तसेच तंत्रज्ञाच्या नेमणुकीबाबतही तपशील नसल्यामुळे संशय व्यक्त केला. गुरुमित बग्गा यांनी 17 कोटी रुपयांचा प्रस्ताव संशयास्पद असल्याचे सांगत एकाच ठेकेदाराकडून सॉफ्टवेअर, हार्डवेअर घेण्याची गरज नसून, त्यांचे पुरवठादारही भिन्न असल्याचे स्पष्ट केले. चारही वस्तू खरेदीसाठी स्वतंत्रपणे इ-निविदा बोलवल्या तर सात ते आठ कोटी रुपयांतच कॅमेरे बसवता येतील, असाही दावा त्यांनी केला. संजय चव्हाण यांनी 26 हजारांत चांगल्या दर्जाचा कॅमेरा मिळत असताना एक लाख रुपयाची तरतूद कशासाठी, असा सवाल केला. कविता कर्डक यांनी सेवाभावी संस्था व दानशूरांना आवाहन करूनही कॅमेरे बसवता येतील, असे सांगत पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना खरेदी नको, अशी मागणी केली. नगरसेवकांचा विरोध बघून महापौरांनी गरज असेल तेथेच कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले. केवळ सिंहस्थापुरतेच नव्हे, तर भविष्यात उपयोग होईल, असे कॅमेरे खरेदी करण्याविषयीही त्यांनी सांगितले.

कॅमेरा लाख रुपयांचा
एक लाखाच्या कॅमेर्‍यासाठी बीएसएनएल कनेक्शनची 80 हजार रुपये परवाना फी द्यावी लागेल, असे सांगत विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी कॅमेरे किती खरेदी करणार, असा प्रश्न केला. कार्यकारी अभियंता आर. के. पवार यांनी 200 कॅमेरे खरेदीचा प्रस्ताव आहे असे सांगितले. प्रस्तावात 397 कॅमेर्‍यांच्या उल्लेखाने गदारोळ झाला. कॅमेरे जोडणीसाठी दोन हजार मीटर फायबर ऑप्टिकचा अंदाज चुकीचा असल्याचे त्यांनी दर्शवले.

गोदापार्कवरून राष्ट्रवादी-मनसे समोरासमोर
22 फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत गोदापार्कचे भूमिपूजन होणार असल्याचे निमंत्रण भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी दिले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक उभे राहिले व गटनेत्या कविता कर्डक यांनी गोदापार्कच्या रूपाने होत असलेल्या विकासाला विरोध नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच गोदावरी प्रदूषणमुक्त झाल्याशिवाय गोदापार्क करू नये, अशी मागणी केली. गोदापार्कला स्थानिक नागरिक व शेतकर्‍यांचा विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यास महापौरांनी आक्षेप घेत, यापूर्वीच सर्व पक्षांना विश्वासात घेऊन गोदापार्कला मंजुरी देल्याचे सांगत विषय काढू नका, असे सुनावले. महापौर आक्रमक झाल्याचे बघून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष छबू नागरे यांनी प्रेक्षक गॅलरीतून विरोध सुरू केला. त्यास काही सर्मथकांनी साथ दिल्यावर महापौर संतप्त झाले.

प्रेक्षक गॅलरीतून घोषणा; हुल्लडबाजीने महापौर संतप्त
गोदावरी प्रदूषणमुक्त झाल्याशिवाय गोदापार्क करू नये, अशी मागणी करीत विरोध सुरू केल्यानंतर मनसे व राष्ट्रवादीत जोरदार शाब्दिक जुगलबंदी रंगली. गटनेत्यांकडून युक्तिवाद सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतील राष्ट्रवादीच्या सर्मथकांनीही प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केल्यावर महापौर यतिन वाघ यांनी सभागृहाचे सदस्य नसताना बोलण्याचा अधिकार कोणी दिला, असे सुनावले.