आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation News In Marathi, Divya Marathi

बूट, सॉक्स खरेदीसाठी सव्वाकोटीचा घाट, महापालिका शाळांतील 36 हजार विद्यार्थ्यांना लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकीकडे रस्ते, वीज, पाणी व अन्य महत्त्वाच्या कामांची देयके आर्थिक ठणठणाटामुळे अडकल्याचे सत्ताधारी सांगतात. मात्र, असे असतानाही आता दुसरीकडे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स खरेदीसाठी एक कोटी 11 लाख रुपयांचा प्रस्ताव मंजुरीचा घाट घातला जात आहे. स्थायी समितीवर तसा प्रस्ताव आलेला असून, आता सत्ताधारी मनसे याबाबत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचा दावा करीत सत्ताधारी मनसे अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे वृक्ष लागवडीसाठी मध्यंतरी सव्वादोन कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. मात्र, ‘निमा’ या संघटनेने उद्योजकांच्या मदतीने मोफत वृक्ष लागवड करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे हा हा डाव उधळला गेला. परिणामी त्यामुळे उधळपट्टीला चाप लागला. दरम्यान, गतवर्षी महिलांना प्रशिक्षण देण्याचा दोन कोटी रुपयांचा ठेका अचानक सात कोटी रुपयांवर गेला. स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर करताना पाच कोटी रुपयांची वाढ केली.

प्रशिक्षणाचे कंत्राट देताना निविदा पद्धतीला दिलेली बगल व विशिष्ट मक्तेदारावर असलेली मेहेरनजर बघून खुद्द महिला व बालकल्याण सभापतींपासून, तर राष्‍ट्रवादीच्या गटनेत्या कविता कर्डक यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. मुळात आजघडीला अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेले नाहीत. दुसरी बाब म्हणजे, विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑगस्टपर्यंत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रस्तावाला झटपट मंजुरी देण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे समजते.

आज होणार चर्चा
आर्थिक ठणठणाटानंतरही वादग्रस्त प्रस्तावांत भर पडत आहे. स्थायी समितीवर बुधवारी चर्चेला येणा-या एक कोटी 11 लाख रुपयांच्या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना बूट व दोन सॉक्स पुरवण्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाने ठेवला आहे. 36 हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.