आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Sarv Shiksha Abhiyan Issue Nashik

मनपाचे सर्वशिक्षा अभियान धुळीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून संगणक हाताळण्यासाठी व त्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना असावे, यासाठी शासनाने सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत सुमारे सहा वर्षांपूर्वी संगणक दिले होते. हे संगणक सध्या धूळ खात पडले असतानाच महापालिकेने गेल्या वर्षी सर्व शाळांना पुन्हा संगणक देण्याची योजना अंमलात आणली आहे. अनेक शाळांना तर ते अद्यापही मिळालेलेच नाहीत तर काही शाळांना केवळ एक-एक संगणक देण्यात आले आहेत. वर्षभरापूर्वीच दिलेले हे संगणकही बंद असल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत...
खासगी संस्थेचे दुर्लक्ष - महापालिकेनेसंगणक पुरवठा व इतर सुविधांसाठी कल्याण येथील फॅन्सी टेक्नॉलॉजी या खासगी संस्थेला एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे कंत्राट दिले होते. त्याअंतर्गत 550 संगणक, तेवढेच यूपीएस, त्यासाठी लागणारे फर्निचर, वायरिंग, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक तसेच प्रशिक्षक संबंधित संस्थेनेच नेमायचे होते. सर्व सुविधांची नियमित तपासणीही (मेंटेनन्स) त्याच संस्थेने करावयाची होती. प्रशिक्षकांचा पगार करण्याची जबाबदारीही संस्थेचीच होती. मात्र घडले उलटेच.
प्रशिक्षकच नाही - अटी-शर्तीनुसार सुरुवातीस 106 प्रशिक्षकांची नेमणूक फॅन्सी टेक्नॉलॉजीने केली होती. मात्र, केवळ दोन-तीन महिनेच या शिक्षकांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतर प्रशिक्षक आणि संस्था यांच्यात पगारावरून वाद झाले. प्रशिक्षकांना पगारच न मिळाल्याने त्यांनी शाळांवर जाणे बंद केले. प्रशिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणही बंद झाले.
लाखोंचा खर्च व्यर्थ - एक कोटी रकमेपैकी 53 लाखांची बिले महापालिकेने अदा केली आहेत. त्यापोटी पालिकेला संगणकांची कुचकामी खोकी हाती लागली असून, सर्वशिक्षा अभियानांतर्गत देण्यात आलेले संगणक, तसेच महापालिकेने प्रत्येक शाळेला दिलेले संगणकही बंद आहेत. संगणक सुरूच केले जात नसल्याने मोठा खर्च वाया गेला आहे. त्याचबरोबर, कोणत्याही शाळेत संगणकांसाठी आवश्यक वायरिंग योग्यरीत्या केलेली नाही. संगणक ठेवण्यासाठी नीट फर्निचरही नाही. काही शाळांमध्ये संगणक चक्क जमिनीवर ठेवण्याची वेळ आली आहे. कंत्राटदाराने करारनाम्याप्रमाणे कुठलीही पूर्तता केलेली नसताना त्याची देयके महापालिकेने कशी अदा केली, हा प्रश्नच आहे.
केवळ 163 संगणक - महापालिकेच्या शहरात एकूण 128 शाळा आहेत. त्यात जवळपास 43 हजार 500 विद्यार्थी शिक्षण घेतात. काही शाळा चौथीपर्यंत तर काही पहिली ते सातवीपर्यंत आहेत. कराराप्रमाणे 550 संगणक उपलब्ध करून द्यावयाचे होते. मात्र, केवळ 163 संगणकांचाच पुरवठा संबंधित संस्थेने केला. हा आकडा एकूण द्यावयाच्या संगणकांच्या निम्माही नाही. प्रत्येक शाळेच्या विद्यार्थीसंख्येनुसार संगणक देणे गरजेचे होते. तसे ठरलेले असताना कुठलीही कार्यवाही झाली नसून अनेक शाळांना ते केवळ एक-एक तर काहींना ते दिलेच नाहीत. एवढेच काय, प्रत्येक शाळेस किती संगणक दिले याची कुठलीही माहिती महापालिकेकडे नसल्याने महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे.
संगणक उपक्रमाचे बारा, तरीही स्मार्ट क्लास - संगणक उपक्रम अपयशी ठरला तरीही त्यातून महापालिका प्रशासनाने त्यातून कुठलाही धडा न घेता स्मार्ट क्लास उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळेत एक ऑडियो-व्हिज्युअल रूम असणार आहे. त्यात विविध अभ्यासक्रमांचे सॉफ्टवेअर उपलब्ध केले जाणार असून, संपूर्ण अभ्यासक्रम त्यातूनच पूर्ण केले जाणार आहे. तसेच, आवश्यक असलेले एलसीडी प्रोजेक्टर, स्क्रीन, यूपीएस आणि विद्यार्थ्यांसाठी बैठकीची उत्तम व्यवस्था असणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर किंवा निवडणुका झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, पुन्हा कल्याण येथील त्याच संस्थेला ठेका मिळण्याची शक्यता आहे. स्मार्ट क्लास हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उत्तम असला तरीही त्याच्या पूर्णत्वाबाबत, तसेच नियमित सुरू राहण्याबाबत अनेक शंका-कुशंका आहेत. त्यात मुख्यत्वे करून प्रशिक्षकांची समस्या भेडसावणार आहे. आता या उपक्रमासाठी शाळेच्या शिक्षकांनाच प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतु, याबाबत अद्याप निश्चिती नाही.
स्वत:च्या खिशातून दुरुस्ती - शाळेस सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत दोन संगणक दिले होते. तसेच, मागील वर्षी महापालिकेने एक संगणक दिला आहे. असे एकूण तीन संगणक सध्या शाळेत आहेत. मात्र, ते बंद आहेत. ते ठेवण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी योग्य व्यवस्था नाही. स्वत:च्या खिशातून पैसे देऊन मी त्यांची दुरुस्ती करतो. लहान मुले संगणक हाताळत असल्याने ते बिघडणारच. त्यासाठी दुरुस्तीची व्यवस्था हवी. प्रशिक्षक सुरुवातीस काही काळ आले. मात्र, नंतर ते फिरकलेच नाहीत. - शेख फैजूर रेहमान, मुख्याध्यापक, मौलाना अबुल कलाम आजाद विद्यानिकेतन क्र.10 उर्दू स्कूल
संगणक बंदच - खूप दिवसांपूर्वी संगणक शिकवले जात होते. आता मात्र, ते शिकविले जात नाहीत. सध्या तर आमच्या शाळेतील संगणकच बंद आहे. - प्रणाली एकनाथ निकम, इयत्ता चौथी, महापालिका शाळा क्र. 93
प्रशिक्षण आहे कुठे? - आम्हाला संगणक शिकवलेच जात नाहीत. सुरुवातीला अधूनमधून का होईना शिकवले गेले. - प्रज्ञा अजित काळे, इयत्ता चौथी, महापालिका शाळा, पिंपळगाव बहुला
शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना थेट प्रश्न
* संगणक शाळांना मिळालेच नाहीत?
- हे संगणक देण्याचे कंत्राट खासगी संस्थेला देण्यात आले होते. परंतु, प्रत्येक शाळेला ते देण्यात ठरले असताना त्या संस्थेने ते दिले नाहीत. शाळेतील विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात ते देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे संस्थेची पूर्ण देयके अदा केली नाहीत.
* प्रशिक्षण का दिले जात नाही?
- सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण दिले गेले. प्रत्यक्षात संगणकांच्या पुरवठ्याबरोबरच प्रशिक्षकांची व्यवस्थाही संस्थेनेच करावयाची होती. मात्र, संस्थेने प्रशिक्षकांचे पगारच दिले नाहीत. प्रशिक्षक नसल्याने आता विद्यार्थ्यांना शिकविले जात नाही.
* मग महापालिकेने त्यासाठी उपाययोजना का केली नाही?
- महापालिकेने उपाययोजना केल्या आहेत. शिक्षण मंडळास खरेदीचा तसेच कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. परंतु, तसा प्रस्ताव मी शिक्षण मंडळास दिला आहे. लवकरच या बाबत निर्णय घेतला जाईल.