आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्नी पालिकेची उद्या विशेष सभा, सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीवरून महापौरांचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठवाड्यासाठी गंगापूर धरणातील पाणी सोडल्यामुळे महापालिकेला अपेक्षित ४३०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अशक्य ठरण्याची चिन्हे असून, याविरोधात भूमिका घेण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीनुसार शनिवारी (दि. ७) विशेष सभा बोलविण्याचा निर्णय महापौर अशोक मुर्तडक यांनी घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याला धक्का लावला तर कठोर भूमिका घेण्यासाठी नगरसेवक विशेष महासभेत आक्रमक होणार आहेत.

गंगापूर धरण समूहात ५८०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, जायकवाडीसाठी १२०० दशलक्ष घनफूट पाणी गेल्यास ४६०० दशलक्ष घनफूट पाणी उरणार आहे. मुळात, पालिकेने यापूर्वीच शहरासाठी ४६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली आहे. टंचाईची स्थिती लक्षात घेता हीच मागणी ४३०० दशलक्ष घनफुटापर्यंत केली असून, त्यातही महिनाभरापासून पाणी कपात करून दैनंदिन वापर ४१० दशलक्ष लिटर प्रतिमाणशीवरून ३५० दशलक्ष लिटरपर्यंत केला आहे. म्हणजेच, ५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली जात असून, १२०० दशलक्ष घनफूट पाणी सोडले तर गंगापूर धरण समूहात शिल्लक राहणाऱ्या ४६०० दशलक्ष घनफूट पाण्यातून पालिकेला ४३०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अशक्य आहे. गंगापूर धरण समूहातून एक हजार दशलक्ष घनफूट पाणी उद्योग, एकलहरा प्रकल्प, शेती वा अन्य कारणांसाठी आरक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी ३६०० दशलक्ष घनफूट पाणीच शिल्लक राहील. त्यात जुलैपर्यंत पाऊस झाल्यास पुढे मोठी पाण्याची समस्या निर्माण होणार असून, गंगापूर धरणाच्या वरील भागात कोणतेही धरण नसल्याने पाण्याची गरज कशी भागवणार, हा चिंतेचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर विशेष महासभा बोलावून शहरातील ४३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाला धक्का लावू देण्यासाठी ठराव करण्याचा निर्णय शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, कॉंग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील आदी उपस्थित होते.

जलसंपत्ती प्राधिकरणाबाबत महापौरांची नाराजी
जलसंपत्तीप्राधिकरणाने गुरुवारी (दि. ५) ठेवलेल्या सुनावणीत प्रथम नागरिक म्हणून बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्याची अनुमती देण्याचे पत्र महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले होते. मात्र, प्राधिकरणाकडून कोणताही संपर्क झाल्यामुळे महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...