नाशिक - महापालिकेच्या माध्यमातून गल्लीबाेळात हाेणाऱ्या विकासकामांमध्ये वापरले जाणारे साहित्य अर्थातच दगड, विटा, वाळूपासून तर डांबरापर्यंत प्रत्येकाचे माेजमाप केले जाणार असून, एका साॅफ्टवेअरच्या माध्यमातून ही सर्व माहिती नाशिककरांसाठी खुली हाेणार अाहे. त्यानुसार अापल्या घरासमाेर उदाहरणादखल रस्त्याचे काम सुरू असेल तर त्यासाठी किती डांबराचा वापर झाला, किती थर रचले गेले अादींची माहिती पडताळून त्यात सत्यता असल्यास त्याचे रेटिंगही करता येणार अाहे. तफावत असल्यास कमी गुण देऊन संबंधित ठेकेदाराचे पितळही उघडे करता येईल.
महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी स्मार्ट अॅप करताना त्यात ‘नाे युवर्स वर्क्स’च्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील प्रत्येक विकासकामाची स्थिती लाेकांना एका क्लिकसरशी जाणून घेता येईल, अशी व्यवस्था करून दिली. कररूपाने पैसे भरणाऱ्या नागरिकांना पुढे त्यातून नेमके काय हाेते हे जाणून घेण्याचा अधिकार अाहे. त्यातही खेटे मारून माहितीएेवजी चार उलट शब्द पदरात पडण्यापेक्षा विनासायस सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न अाहे. साधारण सात ते अाठ महिन्यांपासून हे अॅप व्यवस्थितपणे कार्यरत असून, अाता त्याचा पुढील टप्पा म्हणून माेजमाज पुस्तिका अर्थातच एमबी रेकॉर्डच लाेकांसाठी खुले करण्याचा निर्णय झाला अाहे. त्यात प्रामुख्याने मोजमाप पुस्तिकांकरिता एक नवीन सॉफ्टवेअर ( E. MB) विकसित करीत आहे. मोजमाप पुस्तिका या तांत्रिक शाखेचा आत्मा असून, एखाद्या कामाला किती विटा, सिमेंट, पाइप्स, केबल्स इत्यादी वापरल्या हे मोजमाप पुस्तिकेवरील नोंदविलेल्या रेकॉर्डवर सहजगत्या समजत असते. त्यामुळे ही माहिती लाेकांसमाेर मांडून त्यात काही त्रुटी असल्यास जाणून घेण्याचा पालिकेचा प्रयत्न अाहे. मोजमाप पुस्तिकेचे सॉफ्टवेअर विकसित झाल्यानंतर मोजमापे मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे रेकॉर्ड करता येतील ती सर्वाना know our works च्या माध्यमातून उपलब्ध होईल.
त्यामुळे एखाद्या कामाकरिता किती ट्रक रेती अथवा अन्य साहित्य वापरण्यात आले आहे ते कळेल प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यानुसार तपासणी करणे साेपे हाेईल, असेही पालिका प्रशासनाने साेशल मीडियावर पाेस्टद्वारे स्पष्ट केले अाहे. यात नागरिकांना स्टार ते स्टार Rating प्रतिक्रिया देण्याची सुविधा या कार्यप्रणालीत उपलब्ध करून देण्यात येणार असून, तूर्तास सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू अाहे.