आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक ठरणार पालिकेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - महापालिकेची आगामी निवडणूक तोंडावर आली असल्याने जेलरोड येथे वॉर्ड क्रमांक ३५ आणि वॉर्ड क्रमांक ३६ ‘ब’मध्ये होणारी पोटनिवडणूक ही महापालिकेच्या अागामी निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे. त्यामुळे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी तर आम्हीच कसे वरचढ असल्याचे दाखविण्यासाठी चारही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे मतदारांमध्येही कोण उमेदवार बाजी मारतो, ही एक उत्सुकता तर लागली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचाच उमेदवार विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. तर, आम्हीच कसे जनतेचे सेवक म्हणून डांगोरा पिटणारे आणि राज्यात सत्तेत असूनही सवतासुभा रचण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेने पोटनिवडणूक होऊच नये म्हणून आमदार योगेश घाेलप, उपशहरप्रमुख नितीन चिडे, दोन्ही अपात्र ठरलेल्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री निवडणूक आयुक्त कार्यालयाचे उंबरठे झिजवले होते. तरीही पोटनिवडणूक होत असल्याने दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता आल्यानंतर मनसेला उतरती कळा लागली. पण, आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आणि अजूनही जाेम कायम असल्याचे दाखविण्यासाठी मनसेचे पदाधिकारी डाॅ. प्रदीप पवार, विभागप्रमुख बंटी कोरडे हे परिश्रम घेत अाहेत. माजी मंत्री छगन भुजबळ हे कारागृहात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व उरलेले नाही. याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे नाशिकरोडला माेजकेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते अाहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयवंत जाधव, नगरसेवक हरीश भंडागे, मनोहर कोरडे, तर काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका वत्सला खैरे, नगरसेवक उद्धव निमसे, रिपाइंचे गणेश उन्हवणे, शशी उन्हवणे यांनी आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी एकत्र येत एकाेपा दाखविला हाेता. पाेटनिवडणूक केवळ पाच दिवसांवर असून, प्रचारासाठीच्या चार दिवसांच्या काळात प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी वैयक्तिक गाठीभेटींवर लक्ष केंद्रित केले आहे. शिल्लक राहिलेल्या दिवसामध्ये मतदारांना आकर्षित करू शकेल असा नेता अाणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना गळ घातली अाहे. या पोटनिवडणुकीतून शहरातील मतदारांचा राजकीय पक्षांबाबतचा कौल लक्षात येणार असून, यातून महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक संदेश दिला जाणार असल्याने भाजप, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय यांनी अापल्या उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...