आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Employee Recruitment,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानधनावरील नियुक्तीनंतर आता महापालिकेत नोकरभरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिडको व सातपूरमधील आरोग्य कर्मचा-यांच्या तुटवड्यावरून महासभेत नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्यामुळे महापौर यतिन वाघ यांनी प्रशासनाला नोकरभरतीसाठी तातडीने प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान, नोकरभरती प्रक्रिया आचारसंहितेत अडकण्याची शक्यता नगरसेवकांनी व्यक्त केल्यानंतर प्रथम मानधनावर नियुक्ती देण्याची प्रक्रिया करावी, अशीही सूचना त्यांनी केली. महासभा सुरू झाल्यानंतर सिडकोचे सभापती उत्तम दोंदे यांनी महापौरांसमोरच बसकण मारली. ‘कर्मचा-यांची पदे रिक्त असल्यामुळे तीन महिन्यांपासून सभापतीची खुर्ची सोडली. आता तरी दाद मिळेल काय’, असा सवाल त्यांनी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी रिक्त पदांच्या प्रभागनिहाय अनुशेषाबाबत विचारणा केली.
त्यात सिडको व सातपूरला कर्मचारी कमी असल्याचे लक्षात आले. याबाबत जोरदार चर्चा झाल्यावर अन्य प्रभागांतील अनावश्यक कर्मचारी सिडको, सातपूरकडे तूर्त वर्ग करण्याच्या सूचना केल्या. सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी ‘नासर्डी नदीतील डास थेट जेवणात पडतात,’ अशी तक्रार केल्यावर सर्वांनीच आरोग्य विभागातील रिक्त पदांकडे लक्ष वेधले. पालिकेला 3200 कर्मचा-यांची गरज असताना 1700 कर्मचारी कार्यरत असल्याचे शिवाजी सहाणे यांनी लक्षात आणून दिले.

प्रारंभी गोंधळ; उत्तरार्धात पाल्हाळ
महासभेच्या सुरुवातीला अभूतपूर्व गोंधळ झाला. दोंदे यांनी रिक्त पदांसाठी बसकण मारली, तर राष्टÑवादी काँग्रेसच्या गटनेत्या कविता कर्डक यांनी मनसेच्या मदतीने पाच लाख रुपयांची रखडलेली कामे सुरू करण्यासाठी सभागृहाकडे धाव घेतली. त्यामुळे सर्वच नगरसेवक कशासाठी एकत्र झाले, असा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, उत्तरार्धात केवळ तीन अधिका-यांची चौकशी करण्यावरून नगरसेवकांमध्ये चर्चेचे गु-हाळ रंगले. तेच मुद्दे, भरकटलेली चर्चा यामुळे चार महिन्यांनंतर झालेल्या महासभेत मिळकतीचे धोरण, साधुग्रामचे अधिग्रहण, रुग्णालयासाठी सुरक्षारक्षक नेमण्यासारखे महत्त्वाचे विषय तहकूब ठेवण्याची वेळ महापौरांवर आली.