आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा दायक: दिल्लीच्या धर्तीवर द्वारका परिसरात पालिका बाजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीचे कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी आता येथील अतिक्रमणे दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मध्यस्थी करीत महापालिकेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथील महापालिकेच्या आरक्षित जागेवर दिल्लीच्या धर्तीवर पालिका बाजार अर्थात, व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. येथून हटविण्यात येणाऱ्या दुकानदारांना नव्या व्यापारी संकुलात प्राधान्य दिले जाणार आहे.
उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतरही द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीत नाशिक-पुणे महामार्गालगतच्या रस्त्यावर असणाऱ्या दुकानांमुळे, व्यावसायिकांमुळे अधिकच भर पडत होती. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी येथील अतिक्रमणे हटवून दिल्लीच्या धर्तीवर या ठिकाणी पालिका बाजार साकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या चार एकर जागेत व्यापारी संकुलाचे आरक्षण असल्याने या भागातील वैद्यकीय अधिकारी निवासस्थान बाजूच्या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
मात्र, या परिसरात अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्याय होऊ नये यासाठी हटविण्यात येणाऱ्या व्यावसायिकांना नव्या संकुलात प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या व्यापारी संकुलामुळे द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम परिसरातील व्यावसायिकांची बैठक झाली होती. त्यात परिसरातील तब्बल ६४ व्यावसायिकांनी या व्यापारी संकुलाला पाठिंबा दिला आहे. लवकरच या व्यापारी संकुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणावर आळा बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
अतिक्रमणे हटवून देणार स्थानिकांना प्राधान्य
- द्वारका येथे दिल्लीच्या धर्तीवर पालिका बाजाराची निर्मिती करताना रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. मात्र, नव्याने तयार करण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलात येथून हटविण्यात येणाऱ्या व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.
प्रा. देवयानी फरांदे, आमदार