आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस आघाडीचे नगरसेवकही आजपासून जाणार सहलीवर, विक्रांत मते, विनायक खैरे यांच्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सहलीला रवाना झाले असताना, दुसरीकडे विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीकडून विक्रांत मते, विनायक खैरे व सुनीता निमसे यांनी उमेदवारीसाठी दावा केला असून, रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आघाडीचे नगरसेवक शुक्रवारी (दि. ५) सहलीला निघण्याची शक्यता आहे.
मनसेचे नगरसेवक सहलीला गेल्यामुळे महापौरपदासाठी राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. स्थायी समितीची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे गटनेते उत्तम कांबळे यांच्या दालनात दोन्ही पक्षांतील नेत्यांची बैठक झाली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अर्जुन टिळे व गटनेत्या कविता कर्डक, तसेच काँग्रेसकडून डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, राहुल दिवे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, दोन्ही काँग्रेसने एकत्र राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे शुक्रवारी काँग्रेस आघाडीचे नगरसेवक सहलीला जाणार असून, सहलीदरम्यान होणारा खर्च सर्वच इच्छुकांनी करण्याचा प्रस्तावही पुढे आला. या प्रस्तावावर रात्री उशिरापर्यंत खल सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसचे नगरसेवक परतले
काँग्रेसचे दोन नगरसेवक गायब असल्याचे वृत्त होते. त्यातील एकाची नगरसेवक कांबळे
यांच्या बैठकीसाठी उपस्थिती होती, तर नगरसेविकेने काँग्रेसबरोबरच असल्याचे सांगत आश्वस्त केले.
भाजपचे लक्ष प्रदेश नेत्यांकडे

भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी नगरसेवकांना संबोधित करताना मनसे व शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय प्रदेश नेत्यांकडून घेतला जाईल, असे स्पष्ट केले. गणेश विसर्जनानंतर भाजपच्या नगरसेवकांना सहलीसाठी जावे लागेल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेसोबत शुक्रवारी (दि. ५) भाजपची बैठक होणार होती. मात्र, तावडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक लांबल्याचे सांगितले जाते.