आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार रुग्णवाहिका, दहा डॉक्टरांचे पथक काश्मीरला रवाना, महापौरांनी सुपूर्द केली स्वत:च्या मंडळाची रुग्णवाहिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- काश्मीरमधील दहशतवादग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशकातून तीन रुग्णवाहिका आणि १० डॉक्टरांसह कार्यकर्त्यांचे पथक बुधवारी सकाळी काश्मीरकडे रवाना झाले.
काश्मीरवासीयांच्या मदतीसाठी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे नाशिकचे समन्वयक जितेंद्र भावे यांनी पुढाकार घेऊन आवाहन केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला होता. नाशिककरांकडून उपलब्ध झालेल्या मदतीनुसार दोन रुग्णवाहिका आणि सुमारे सव्वा लाख रुपयांचा औषधसाठा घेऊन मदतपथक महापौरांच्या निवासस्थानी पोहोचले.
मंडळाची रुग्णवाहिकाही
दोन रुग्णवाहिकांसह नाशिकहून १० डॉक्टरांचे पथक व काही कार्यकर्ते जात असल्याची माहिती समन्वयक जितेंद्र भावे यांनी महापौरांना दिली. त्यावर महापौरांंनी त्वरित त्यांच्या कैलास मित्र मंडळाची रुग्णवाहिका ह्यरामायणह्ण या निवासस्थानी बोलावून घेऊन काश्मीरच्या मदतीसाठी या पथकासोबत रवाना होणार असल्याचे जाहीर केले. पथकाला हिरवा झेंडा दाखवून काश्मीरकडे रवाना केले.
आडगाव कॉलेजचे डॉक्टर्स
या पथकात आडगाव मेडिकल कॉलेजच्या १० डॉक्टरांचा समावेश असून साधारणपणे सव्वा लाख रुपयांच्या औषधांचा साठादेखील रुग्णालयात सज्ज ठेवला आहे. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, जितेंद्र भावे, पद्माकर इंगळे, ऋषिकेश परमार, मयूर रौंदळ, जॉस श्रीवास्तव, सचिन शिनगारे आदी उपस्थित होते.