नाशिक - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धाेकेदायक इमारतींना महापालिकेने नाेटीस बजावली असून, जवळपास २७५ धाेकेदायक इमारतींना स्ट्रक्चरल अाॅडिट अर्थातच संरचनात्मक परीक्षण करून बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक केले अाहे.
दरवर्षी पावसाळ्यात धाेकेदायक इमारतींचा मुद्दा एेरणीवर असतो. खास करून जुने नाशिक पंचवटी भागात अनेक जुने वाडे अाहेत. या वाड्यांचे अायुर्मान ५० वर्षांपेक्षाही अधिक अाहे. वाड्यांची अनेक ठिकाणी पडझड झाली असून, भाडेकरू मालक यांच्यातील वादामुळे जागेवरील ताबा साेडण्यासाठी काेणी तयार हाेत नाही. अशा परिस्थितीत वाड्याची पडझड झाल्यास रहिवासी अडकून त्यांच्या जीविताला धाेका निर्माण हाेताे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून दरवर्षी धाेकेदायक इमारतींचे नगररचना विभागामार्फत सर्वेक्षण करून नाेटिसा बजावल्या जातात. प्रत्यक्षात या नाेटिसांचा निव्वळ फार्सच असून, काेणतीही कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे.
मात्र, पालिकेला नाेटीस बजावण्याची अाैपचारिकता पूर्ण करावी लागत असून, यंदाही २७५ धाेकेदायक इमारतींना नाेटिसा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.
अाॅडिटच्या दुरुपयाेगाची भीती
जुने नाशिक परिसरात अनेक वाड्यांच्या जागांना अाता काेट्यवधी रुपयांचे भाव अाले अाहेत. या पार्श्वभूमीवर भाडेकरू मालकांत वाद हाेत अाहेत. भाडेकरू जागा साेडत नसल्यामुळे वाडे धाेकेदायक असल्याचे प्रमाणपत्र मिळावे, अशी अपेक्षा घेऊन मालक स्ट्रक्चरल अाॅडिटरकडे जात अाहेत. मात्र, अाॅडिटरला असे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नसून, गरजेप्रमाणे खराब भागाबाबत उपाययाेजना वा काढून टाकण्याबाबत सूचना केली जात असल्यामुळे त्याकडे मालकांकडून पाठ फिरवली जाते, असेही सूत्रांचे म्हणणे अाहे. पालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धाेकेदायक इमारतींना नाेटीस बजावली अाहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात अाले अाहे.
पालिकेकडून स्ट्रक्चरल अाॅडिटसाठी अावाहन
पालिकेने वर्तमानपत्रातून जाहीर अावाहन करीत ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल अाॅडिट करून घेण्याचे अावाहन केले अाहे. इमारतींनी भाेगवटा प्रमाणपत्र प्राप्त केल्यापासून तीस वर्षांचा कालावधी झाला. त्यांच्यासाठी अाॅडिट अनिवार्य अाहे. या इमारती वास्तव्यासाठी याेग्य अाहेत की नाही, याचे प्रमाणपत्र महत्त्वाचे अाहे. अशा धाेकेदायक इमारतींची पालिकेने यादी तयार केली असून, संबंधित इमारतीतील रहिवाशांनी स्ट्रक्चरल अाॅडिट केले की नाही, याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी संबंधित अाॅडिटरवर दिली अाहे.
स्ट्रक्चरल अाॅडिटसाठी सिव्हिल टेक, शिवाजी गार्डनमागे, सीबीएस, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर अॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे काॅलेज अाॅफ इंजिनिअरिंग, उदाेजी मराठा बाेर्डिंग, गंगापूरराेड तसेच संदीप पाॅलिटेक्निक, महिरावणी यांच्याशी संपर्क साधण्याचे अावाहनही करण्यात अाले अाहे.