आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यानात रंगतात मद्यपींच्या पाटर्य़ा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- जेलरोड विभागातील प्रभाग 32 मधील सह्याद्री सोसायटीतील महापालिकेच्या उद्यानाचा ताबा रात्री 8 वाजेनंतर मद्यपी घेतात व तेथे उच्छाद मांडत असल्याचे सध्याचे चित्र आहे. यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले असून, मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
उद्यान बंद होण्याची वेळ रात्री 8.30 वाजेची असताना उशिरापर्यंत येथे उघडपणे मटण-दारूच्या पाटर्य़ा रंगत आहेत. मद्यपीकडून नशेत शिवीगाळ व गोंधळ घातला जात असल्यामुळे परिसरातील रहिवासी वैतागले आहेत. या उद्यानाच्या देखभालीसाठी कर्मचारी नेमला असून, त्याच्यासाठी तेथे निवास व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. तरीही आजूबाजूचे मद्यपी रात्री 8 वाजेनंतर उद्यानात बसून मद्यप्राशन करतात. उद्यानात रंगणार्‍या या ओल्या पाटर्य़ांमुळे उद्यान अस्वच्छ होते. या ओल्या पाटर्य़ांमुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होत ते उद्यानात पडलेल्या मद्यपींच्या सिगारेट हातात घेऊन त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिक सायंकाळी उद्यानात असतानाच मद्यपी उद्यानाचा ताबा घेऊन तेथे बिअरबार थाटतात. हा प्रकार होत असताना कर्मचार्‍याकडून मद्यपींना हटकले जात नसल्याने आजूबाजूच्या मद्यपींची गर्दी वाढली आहे. तत्कालीन नगरसेवक दिनकर आढाव यांच्या कार्यकाळात विकसित केलेले हे उद्यान जेलरोडला सुस्थितीत असलेले उद्यान म्हणून ओळखले जात होते. सध्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील लॉन्सवर मद्यपींचा ताबा असल्याने बालगोपाळ खेळण्यापासून वंचित राहात आहेत. प्रभाग 32 चे नगरसेवक शैलेश ढगे यांनी प्रभाग 35च्या समस्या सोडवण्यासाठीच्या पुढाकारामुळे प्रभावित झालेल्या रहिवाशांनी त्यांना थेट पालकत्व स्वीकारण्याचे साकडे घातले. दुसरीकडे त्यांच्याच प्रभागातील रहिवासी मद्यपीमुळे त्रस्त असताना त्यांचे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.