आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका गाळेधारकांना दिली अखेर मुदतवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे अाणि जागांच्या परवाना (लायसन्स) शुल्क शीघ्रगणक (रेडीरेकनर) दराने वाढ करणे, तसेच गाळ्यांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अखेर शनिवारी (दि. २०) फेटाळण्यात अाला. सध्या अस्तित्वात असलेल्या गाळेधारकांना पुढील १५ वर्षे मुदतवाढ देऊन या गाळेधारकांकडून नियमानुसार भाडेवाढ घेण्याचा निर्णय स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी या सभेत जाहीर केला.
शनिवारी (दि. २०) झालेल्या बैठकीत स्थायी समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील महापालिकेच्या सुमारे १७२० गाळेधारकांना दिलासा मिळाला अाहे.
शीघ्रगणक (रेडीरेकनर) संदर्भातील धाेरण पालिकेच्या महासभेत ठरल्यानंतर तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्याचे यावेळी सभापतींनी अादेशित केले. प्रत्येक भागाचा दर वेगळा असावा, अशी मागणी सुरेखा भाेसले यांनी केली. अागरटाकळी भागातील मलनिस्सारण केंद्राच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे अाराेग्य धाेक्यात अाल्याची बाब राहुल दिवे यांनी निदर्शनास अाणून दिली. यावेळी मेधा साळवे, प्रा. कुणाल वाघ, शैलेश ढगे, शाेभा फडाेळ, रंजना भानसी यांनीही प्रशासनाला धारेवर धरले.

भूसंपादनाच्या प्रस्तावांवरून सभापती शिवाजी चुंभळे अाणि नगरसेवक प्रा. कुणाल वाघ यांच्यात जाेरदार हमरीतुमरी झाली. या प्रस्तावांना मंजुरी देता पाहणी दाैरे करावे त्यानंतर निर्णय घ्यावा, असे प्रा. वाघ यांनी सांगितले. प्रस्ताव मंजूर केल्यास महापालिकेला माेठा अार्थिक फटका बसेल, असेही त्यांनी सांगितले. सभापतींनी मात्र शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे अजून किती दिवस अडवणार, असे सांगत प्रा. वाघ यांच्या मागणीला विराेध केला. यावेळी दाेघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सभापतींनी प्रा. वाघ यांना ‘गेट अाउट’ म्हटल्याने हा वाद शिगेला पाेहोचला. यावेळी प्रा. वाघ यांनी सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. परंतु अन्य सदस्यांच्या अाग्रहास्तव त्यांनी शांत राहण्याची भूमिका घेतली. अखेर न्यायालयाचा अादेश असलेल्या मिळकतींचे प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय सभापतींनी जाहीर केला.