आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशे-हजारच्या नोटांद्वारे करभरणा पालिकेने नाकारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोषागाराचा थेट संबंध रोख रकमेशी येत नसून सर्वच व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जात असल्याने एक हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्याचा कुठलाही परिणाम कोषागाराच्या कामकाजावर होणार नसल्याचे या विभागाकडून स्पष्ट कऱण्यात आले.
कोषागारातून निधी विविध शासकीय खात्यांनाच दिला जातो. हा करोडो रुपयांचा निधी थेट आरटीजीएस किंवा नेफ्ट केला जातो. हा सर्व व्यवहार ऑनलाइनच केला जात असल्याने कुठल्याही अडचणी येण्याची शक्यता नसल्याचे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कोषागारातून एसबीआयच्या शाखेतही रोखीने व्यवहार होत नाही. तसेच, विविध विभागांकडून येणारी बिलेही ऑनलाइनच सादर होतात. सर्व शासकीय खात्यांनाही त्याची अडचण नसल्याने शासकीय कामकाजावरही या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा कुठलाच परिणाम होणार नाही. त्याचबरोबर ऑनलाइन व्यवहार सुरू राहणार असल्याने सर्वसामान्यांनाही क्रेडिट-डेबिट कार्ड स्वॅप करता येतील. ऑनलाइन अर्थात इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग करता येणार असल्याने फार चिंता करण्याची गरज नसल्याचे कोषागार अधिकारी बाळासाहेब घोरपडे यांनी सांगितले.
प्रतिनिधी | नाशिक
चलनातूनबाद झालेल्या पाचशे एक हजार रुपयांच्या नाेटा बँका अाणि पाेस्ट कार्यालयातून गुरुवारी (दि. १०) सकाळपासून नागरिकांना बदलून मिळणार अाहेत. सर्व बँका त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा तासभर अाधी उघडणार अाहेत. मात्र, नाेटा बदलण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने गुरुवारीच बँकांत गर्दी करण्याची गरज नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांसह बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले अाहे. राष्ट्रीयीकृत बँका या नाेटांच्या अदलाबदलीच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाल्या असून, टपाल कार्यालयातही नागरिकांना ही सेवा उपलब्ध हाेणार अाहे, सहकारी बँकांना मात्र किती रक्कम वाटायला मिळणार याबाबत संभ्रमावस्था अाहे. विशेष म्हणजे, शनिवारी रविवारीही बँकांचे कामकाज सुरू राहणार अाहे.

दरम्यान, बँका अंतर्गत कामकाजासाठी बुधवारी सुरू असल्या तरी ग्राहकांसाठी बंद हाेत्या. एटीएम मशिन्समध्ये मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत, पाचशे हजार रुपयांच्या जमा असलेल्या नाेटांची अाकडेवारी एकत्रित करून त्याची माहिती प्रत्यक्ष नाेटा एकत्रित करून त्या बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चेस्ट शाखांना जमा केल्या. बँकांची क्लिअरिंग हाऊस बंद हाेती. त्यामुळे ज्यांचे इएमअाय नाेव्हेंबरचे हाेते, त्यांना अापाेअाप एक दिवस वाढवून मिळाला अाहे. काही दिवसांपूर्वीच नव्या नाेटा बँकांत जमा झाल्या असून, अापणही त्या अद्याप पाहिलेल्या नाहीत अाणि महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान एकदम असा निर्णय जाहीर करणार असल्याची कुठलीच कल्पना नसल्याचे एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
प्रतिनिधी | नाशिक
पाचशेहजाराच्या नोटा चलनातून अचानक रद्द करण्यात आल्याने नागरिकांना बुधवारी (दि. ९) अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनात आणण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर काढल्याने दुकानदारांसह पेट्रोलपंपांवर सुटे देण्यासाठी पैसेच शिल्लक नव्हते. महापालिकेचा आर्थिक आधार असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी विभागात पाचशे हजाराच्या नोटा स्वीकारण्यास खुद्द आयुक्तांनीच नकार दिल्याने महापालिकेत कर भरण्यासाठी आलेले शेकडो नागरिक परत गेले. मंगळवारी घरपट्टीची जमा १६ लाख ६३ हजार रुपये हाेती, तर बुधवारी ती १५ लाख रुपये राहिली. त्यातही जास्तीत जास्त अाॅनलाइन भरणा हाेता. मंगळवारी पाणीपट्टी सहा लाख भरण्यात अाली असताना ती बुधवारी एक लाखापर्यंत उतरली.

मंगळवारी रात्री पाचशे हजाराच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक नागरिकांनी थकीत कर महापालिकेची घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच विभागीय कार्यालयात गर्दी केली. मात्र, महापालिकेच्या विभागीय कार्यालयांत कोणत्याही करासाठी पाचशे हजाराच्या नोट स्वीकारू नये, असे आदेश आयुक्तांनी दिल्याने पाचशे हजाराच्या नोटा नाकारण्यात आल्या. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत दररोज येणाऱ्या रकमेपेक्षा कमी रक्कम बुधवारी जमा झाली. पूर्व विभागात तर २१ हजार ते एक लाखापर्यंत घरपट्टी जमा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत पाठविण्यात आले. त्याचबरोबर पंचवटी, सिडको, सातपूर नाशिकरोड विभागातही याचप्रमाणे पाचशे हजाराच्या नोटा घेऊन कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत पाठविण्यात आले.

अाज बँकांमध्ये मिळणार दाेन हजार, शंभरच्या नाेटा
गुरुवारी(दि. १०) सकाळी साडेदहा वाजेपासून काेणत्याही नागरिकाला त्याच्याकडील पाचशे एक हजार रुपयांच्या जुन्या नाेटा स्वीकारून नव्या नाेटा बदलून दिल्या जाणार अाहेत. याकरिता बँका सज्ज झाल्या असून स्वतंत्र एक्सचेंज काउंंटर्स उघडली जाणार अाहेत. बहुतांश बँकांकडे शंभर अाणि दाेन हजार रुपयांच्या नाेटा अालेल्या असल्याने त्याच गुरुवारी बदलून मिळतील. एका ग्राहकाला एका दिवसाला चार हजार रुपये बदलून मिळणार अाहेत. त्यासाठी पॅनकार्ड, निवडणूक अाेळखपत्र, अाधारकार्ड, पासपाेर्ट यापैकी काेणत्याही एका अाेळखपत्राची झेराॅक्स बँकेत उपलब्ध असलेला फाॅर्म-१ भरून त्यासाेबत जाेडावी लागेल. यानंतरच नाेटा बदलून मिळतील. ग्राहकाला अापल्या बँक खात्यातून दिवसाला दहा हजार, तर खाते अाणि एटीएम मिळून अाठवड्याला कमाल २० हजार रुपये काढता येणार अाहेत. खात्यात राेख रक्कम भरण्यासाठी मात्र काेणतेही कमाल बंधन नाही.

शासकीय कार्यालयातच नोटांना नकार का?
किमान शासकीय कार्यालयात तरी पाचशे हजारांच्या नोटा स्वीकारल्या जातील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, महापालिकेच्या वतीने कराची रक्कमही या नोटांद्वारे घेण्यात आल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...