आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरसेवकांच्या लांबलचक भाषणांमुळे महापौरांची कोंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महासभेसारख्या महत्त्वाच्या सभागृहाला राजकीय आखाडा समजून सत्ताधार्‍यांपासून विरोधी पक्षातील प्रमुख नगरसेवकांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यात जवळपास दोन तास खर्च केले. यामुळे चार महिन्यांनंतर झालेल्या शुक्रवारच्या महासभेवर पाणी फेरले गेले. एकीकडे राज ठाकरे यांनी मनसेसाठी रोज आजचा दिवस शेवटचा याप्रमाणे काम सुरू केले असताना महासभेतील टाइमपास रोखण्याचे आव्हान आता महापौरांवर असेल.
शुक्रवारी प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या पहिल्या महासभेत वेळेचे नियोजन करून विषयपत्रिकेवरील सर्व विषय मार्गी लावण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले. तीन महिला अधिकार्‍यांवरील कारवाईच्या मुद्यावरून जवळपास दोन तास खर्ची पडले. विशेष म्हणजे, या चर्चेत अनेक बुद्धिजीवी, ज्येष्ठ नगरसेवकांबरोबरच विद्यमान पदाधिकार्‍यांनीही सहभाग घेतला. यात सरळ सरळ दोन गट पडले होते.
सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी तर काम झाले नाही म्हणून कोणावर टीका करू नका, असे सांगितल्यामुळे अधिकार्‍यांनी कामे केली नाही तर त्यांना लक्ष्य केले जाते का, असाही सवाल निर्माण झाला.ज्येष्ठ नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी त्यावर तुमचे काम झाले म्हणून भलामणही करू नका, असा टोला लगावल्यामुळे कामे केली तर अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घातले जाते का, असाही सवाल निर्माण झाला. हा प्रकार सुरू असताना माजी उपमहापौर देवयानी फरांदे, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व प्रकाश लोंढे यांची एकमेकांना टोला लगावणारी भाषणे सुरूच होती. महापौर अँड. वाघ यांनी सभागृहाचा महत्त्वाचा वेळ जात असल्याचे बघून नगरसेवकांना चाप लावण्याचे सोडून सढळ हाताने बोलण्यास परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे महासभा नेमकी शहर विकासाच्या महत्त्वाच्या कामासाठी की, राजकीय खदखद व्यक्त करण्यासाठी होती, असाही सवाल निर्माण होत आहे.