आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राचा खून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दारू पिण्यास पैसे मागितले असता त्यास नकार दिला म्हणून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना जुने नाशिक येथे रविवारी रात्री घडली. भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास जुने नाशिकमधील बुधवार पेठेतील गजराज चौकातील मिरजकर ज्वेलर्स या दुकानासमोर सुशील भावसार (27, रा. बुधवार पेठ, जुने नाशिक) व विशाल चौधरी (26, रा. हिरावाडी, पंचवटी) या दोघांमध्ये वाद झाला. विशाल याने सुशीलकडे दारू पिण्यास पैसे मागितले. मात्र, सुशीलने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग येऊन विशालने चाकूने सुशील भावसार याच्या डाव्या बरगडीखाली वार केल्याने यात सुशील गंभीर जखमी झाला.
त्यास बुधवार पेठेतील हृषिकेश चौधरी याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यास डॉ. बागुल यांनी तपासले असता रात्री 8.30 वाजता सुशील भावसार यास मृत घोषित केले. या प्रकरणातील सुशील भावसार हा एनबीटी विधी महाविद्यालयात शिपाई म्हणून कामास होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव भोसले व निरीक्षक कैलास बारावकर यांनी आरोपीस तत्काळ अटक केली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.