आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खून प्रकरणातील ‘प्रिन्स’ची पोलिसांना मारहाण, नाशिकराेड कारागृहाच्या प्रवेशद्वारावरील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड, निखिल गवळे या दोघांच्या खूनप्रकरणातील पीएल ग्रुपचा मुख्य संशयित प्रिन्स सिंग आाणि चार संशयितांनी कैदी पार्टीच्या पोलिस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. शुक्रवारी (दि. १) सकाळी ११ वाजता मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना अटक करण्यात आली आहे. पीएल ग्रुपच्या या गुन्हेगारांची कारागृहात दादागिरी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पोलिस कर्मचारी संजय जाधव यांच्या फिर्यादीनुसार सराईत गुन्हेगार आव्हाड, गवळे या दोघांच्या खूनप्रकरणी मध्यवर्ती कारागृहात असलेले संशयित प्रिन्स चंद्रसेन सिंग (रा. कामटवाडा), सनी उर्फ ललित अशोक विठ्ठलकर (रा. सावतानगर), निखिल मधुकर निकुंभ (रा. दत्तनगर, सातपूर), अशोक सुकदेव गायकवाड (रा. सातपूर), अनिल उर्फ पवन विजय भोळे (रा. मनमाड) आणि शंकर केदू जाधव (रा. ओझर) या सर्वांना खासगी वाहनातून न्यायालयात नेले जात होते. संशयितांनी आम्हाला बसण्यास जागा नाही, खासगी वाहनातून का नेले जात आहे, असे म्हणत वाद घातला. पोलिसांशी हुज्जत घालू नका, असे सांगत असताना पाेलिस कर्मचारी जाधव, कोळी यांच्यावरच संशयितांनी हल्ला चढवला. सहा संशयितांनी मारहाण केल्याने कर्मचारी जाधव दीपक काेळी हे गंभीर जखमी झाले. कारागृहाच्या आवारातील काही पाेलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी या पोलिस कर्मचाऱ्यांची गुंडांच्या तावडीतून सुटका केली. मात्र, संशयितांनी या पोलिस कर्मचाऱ्यांनाही दमदाटी केल्याने तणाव निर्माण झाला. अतिरिक्त पोलिस कुमक अाल्यानंतर संशयितांना नाशिकरोड पोलिस ठाण्यात नेण्यात आले. खूनप्रकरणातील मुख्य संशयित नगरसेवक पुत्र पीएल ग्रुपचा म्हाेरक्या भूषण लोंढे अजूनही फरार आहे. एक महिन्यापूर्वी नगरसेवक लोंढे यांनी याच संशयितांना पाण्याच्या बाटलीतून मद्य देण्याचा प्रयत्न केला होता. कर्मचारी आहिरे यांनी त्यास विरोध केल्यानंतर लोंढे यांनी पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली होती. त्यावेळीही या संशयितांनी पोलिसांना दमदाटी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक संजय देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संशयितांच्या तत्काळ मुसक्या आवळल्या.
कैदी पार्टी संशयाच्या भोवऱ्यात
ग्रामीण पोलिस दलाच्या कैदी पार्टीने संशयितांना नेण्यासाठी खासगी वाहन का आणले, याबाबत शहर पोलिस अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला अाहे. कारागृहातील या सराईत गुन्हेगारांना सर्व साेयीसुविधा पुरवल्या जात असल्याचा संशय आहे. एकीकडे शहर पोलिसांकडून ‘ऑपरेशन भाई’ सुरू असताना कारागृहातील संशयितांनी पोलिसांवर हल्ला केल्याने या संशयितांनाही ‘खाकी’चा हिसका दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...