आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपूरला पुन्हा खून; सलग तिसरी घटना, नवीन पोलिस आयुक्तांसमोर गुन्हे रोखण्याचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक / सातपूर - शहरात खून आणि लुटमारीचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास सातपूर परिसरात फाशीच्या डोंगर परिसरात आणखी एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार केलेला मृतदेह आढळला. पंधरा दिवसांत खुनाची ही तिसरी घटना आहे. शहरात गुन्हेगारीचे सावट पसरले असल्याचे यातून निदर्शनास येत आहे.
सातपूर परिसरातील फाशीच्या डोंगर परिसरात एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह गस्तीवर असलेल्या पोलिसांना आढळला. संतोष नामदेव कसबे (३०, रा. मटन मार्केटमागे, गोवर्धन मळा, सातपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, वासाळी शिवारात अमोल मोहिते या तरुणाचे अपहरण करण्यात येऊन खून करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असताना फाशीच्या डोंगर परिसरातील राजू गुप्ता (२४) या तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला होता. ही घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा एका तरुणाचा मृतदेह आढळला.
या तरुणाच्या शरीरावर लाल तिखट आणि छातीवर धारदार शस्त्राने वार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणाचेही प्रथम अपहरण नंतर खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृत तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सातपूर, वासाळी या ग्रामीण भागांत पोलिसांची गस्त होत नसल्याने ही निर्जन स्थळे गुन्हेगारांचा अड्डा बनल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नवीन पोलिस आयुक्तांपुढे गुन्हे रोखण्याचे आव्हान : तत्कालीन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या काळात गुन्हेगारीचा टक्का वाढला होता. घडलेल्या गुन्ह्यांपैकी निम्मे गुन्हेही उघडकीस आले नसल्याने पोलिस आयुक्तांना लोकप्रतिनिधींच्या टीकेचे धनी व्हावे लागले होते. शुक्रवारी (दि. ३) एस. जगन्नाथन यांनी पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. वाढते गुन्हे रोखण्यात अधिक बोलता त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन मोठे आव्हान असल्याचे सांगून एक प्रकारे शहराच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्षच केल्याची चर्चा खुद्द पोलिस दलात होत आहे. सध्या पोलिस आयुक्तालयात बैठकांचा धडाका सुरू असून, यामध्ये वाढते गुन्हे रोखण्यासाठी ठोस नियोजन नसल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पदभार स्वीकारल्यांनतर खून, लूटमार, गोळीबार आणि इतर गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. गुन्हेगारांनी एक प्रकारे आयुक्तांना सलामीच दिल्याची चर्चा आहे.

अशी मालिका गुन्ह्यांची...

सातपूर परिसरात अमोल मोहिते या तरुणाचा खून, पंचवटीत शेतकऱ्याची लाखांची लूट, वासाळी शिवारात राजू गुप्ता या तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला. अंबड परिसरात सराईत गुन्हेगारांकडून गोळीबार, पंचवटीमध्ये सराईत गुन्हेगारांकडून पिस्तूल हस्तगत, गंगापूर परिसरात व्यावसायिकाची साडेचार लाख रुपयांची लूट असे गंभीर गुन्हे घडले आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांमधील सुंदोपसुंदी अद्याप कायम

तत्कालीन पोलिस आयुक्तांच्या काळात वरिष्ठांवर अन्याय झाल्याची चर्चा होती. त्या काळात एकही गुन्हा उघडकीस आणण्यास अधिकारी फारसे गंभीर नव्हते. नवीन आयुक्तांच्या काळातही तोच कित्ता अधिकारी गिरवत असल्याचे वाढलेल्या गुन्ह्यांतून निदर्शनास येत आहे.

पोलिस आयुक्तांकडून ठोस पाऊले उचलण्याची अपेक्षा

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नूतन पोलिस आयुक्तांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. सिंहस्थाच्या आव्हानासह गुन्हेगारी रोखण्याचे आव्हानही आयुक्तांनी पेलावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.