आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Murder In Nashik, Alerts In Nashik After Muerder

ना‍शिकमध्ये तणाव अन् दगडफेक; आश्वासनानंतर स्वीकारले चांगले, सोनवणे यांचे मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मोहन चांगले व दीपक सोनवणे खून प्रकरणी संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा कुटुंबीय व मित्रांनी घेतल्याने बुधवारी जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी आरोपी कोणीही असला तरी अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान, एसटी बसेसवर दगडफेक झाल्याने पळापळ झाली.

मंगळवारी रात्री आनंदवल्ली भागात टोळक्याच्या हल्ल्यात चांगले व सोनवणे गंभीर जखमी होऊन नंतर त्यांचा मृत्यू झाला. चांगले याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला असता चांगले कुटुंबीय व मित्रांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. सकाळी नऊपासूनच रुग्णालय आवारात मोठा जमाव जमल्याने दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दलासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. मृतांच्या नातलगांची पोलिस अधिकार्‍यांनी समजूत काढूनही ते ऐकत नसल्याने आयुक्त सरंगल तेथे आले व फिर्यादी रामदास चांगले व शरद चांगले यांना बाजूला घेत त्यांच्याशी चर्चा केली. चांगले बंधूंनी मुख्य आरोपी राजकीय नेता असल्याने त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. त्यावर सरंगल यांनी आरोपीवर निश्चित कारवाई व सर्व आरोपींना लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर चांगले बंधूंनी मृतदेह स्वीकारला.

बसची तोडफोड; दुकाने केली बंद
जमावातील काही लोकांनी त्र्यंबकेश्वर-पुणे बसवर (एमएच 14 बीटी 2821) दगडफेक केली. बसच्या काचा फुटून दोन प्रवासी जखमी झाले. पोलिसांनी दगडफेक करणार्‍यांवर सौम्य लाठीमार करताच पळापळ झाली. त्यापाठोपाठ मेनरोड, शालिमार, सीबीएस, नवीन बसस्थानक परिसरात दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने दुकानदार, हातगाडीवरील विक्रेत्यांना व्यवहार बंद करण्यास सांगिल्याने दहशत पसरली होती. मात्र, बंदोबस्त लावल्याने अनुचित प्रकार टळला.

आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची
मृत मोहन चांगलेसह चारही संशयित आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. चांगलेवर खून, खुनाच्या प्रयत्नाचे दोन, हाणामारीचे दोन आणि दरोड्याचा एक असे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला 2008 मध्ये दोन वर्षांसाठी तडीपारही करण्यात आले होते. संशयित आरोपी गिरीश अप्पू शेट्टी (रा. नेहरू चौक) याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे दोन, दंगल, दरोड्याचे प्रत्येकी एक आणि खून असे पाच गुन्हे दाखल असून, तडीपारीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. व्यंकटेश नानासाहेब मोरे (रा. अशोकस्तंभ) याच्याविरुद्ध विनयभंग, लूटमार, खुनाचा प्रयत्न असे चार; तर सराइत कुख्यात गुन्हेगार अर्जुन संपत पगारे याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी कृष्णकांत बिडवे यांच्या हत्येसह लूटमार, खुनाचा प्रयत्न, वाहन जाळपोळ, दंगल, दरोड्यासारख्या 19 गंभीर गुन्ह्यांची मालिकाच दाखल आहे. राकेश कोष्टीविरुद्धही दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत.

एकाच टोळीत फूट
एकाच टोळीत वेगवेगळी कामे करताना वाद होऊन फूट पडल्याने खून झाल्याचा संशय उपआयुक्त साहेबराव पाटील यांनी व्यक्त केला. चांगलेसोबतच कोष्टी, शेट्टी, मोरे काम करीत होते. अचानक वादामुळे हा प्रकार घडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.