आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुर सुरांनी उजळली लक्ष्मीपूजनाची पहाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ललत रागाने केलेला मैफलीचा प्रारंभ आणि गारव्यामध्ये ओतलेली तन्मय गानआराधना यामुळे गंगापूररोड परिसरातील नागरिकांना एक अत्यंत वेगळा असा आत्मानंद मिळाला. प्रसिद्ध शास्त्रीय गायक सोमनाथ मडरुल यांचे सुपुत्र, तरुण शास्त्रीय गायक कुमार मडरुल यांच्या खणखणीत आवाजाने लक्ष्मीपूजनाची पहाट उजळून निघाली. ‘नसती उठाठेव’ मंडळाने त्यांच्या गायनाचे नरसिंहनगर येथे आयोजन केले होते.

ललत रागातील मनभावन अशी गंभीर आणि भावविभोर आलापीची गुंफण या वेळी रसिकांना मोहवून गेली. प्राजक्ताचा सडा अंगणी पडावा, पानांची लुब्ध सळसळ व्हावी, ऐन हिवाळ्यात गुलमोहर झुरावा, तशी मडरुल यांची ही मैफल क्षणोक्षणी सहा ऋतूंचा अनुभव देणारी होती.

राग देसकार सुरू होताना हलकेच आभाळी उगविणारा सूर्यही तल्लीन व्हावा, मडरुल यांच्या सुस्पष्ट, स्वच्छ आवाजाने संगीतातल्या अद्वैताशी एकरूप व्हावा इतका लीन व्हायला लावणारा अनुभव रसिकांना या वेळी मिळाला. देसकार रागातून सूर्याला वाहिलेले अघ्र्य सर्व दिशांचा तम नाहीसा होऊन उजळविणारे ठरले. भोवतीचा निसर्ग, सुरांचे उबेने कमी कमी होत जाणारी थंडी यामुळे प्रत्येक कानसेन तृप्त होत होता. पक्षीकुंजनही या सुरावटींमध्ये दंग झाले होते. या तल्लीनतेत भक्तीचा रस ओतत मडरुल यांनी भजन सादर केले. त्यांना संवादिनीवर पंडित सुभाष दसककर यांनी, तर तबल्यावर पुण्याचे तबलावादक चारुदत्त फडके यांनी साथ केली. अमृता जाधव आणि राजिंदर कौर यांनी तानपुर्‍यावर साथ केली. या वेळी श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.